कल्याण – फेब्रुवारी, मार्च महिन्यांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरे आणि शिळफाटा, कल्याण मुरबाड रस्ता भागातील शाळांमधील परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची महिनाभर येजा असणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो मार्गाची, शाळा परिसरातील सीमेंट काँक्रीट रस्ते कामे सुरू असलेल्या ठिकाणची सर्व कामे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याचा विचार करून काही दिवस थांबून ठेवावीत, अशी मागणी डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर, सरचिटणीस किशोर सोरखादे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तांकडे केली आहे.
मागील दोन वर्षापासून कल्याण, डोंबिवलीत दिवस, रात्र वाहतूक कोंडी असते. शिळफाटा रस्त्यावर मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. काटई गावाजवळ निळजे उड्डाण पुलाचे काम रेल्वेकडून सुरू आहे.
हा भाग नेहमी वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा मानपाडा, उंबार्ली, काटई, पलावा भागात अनेक शाळा आहेत. याठिकाणी डोंबिवली शहर परिसरातील विद्यार्थी दहावी, बारावीच्या परीक्षा देण्यासाठी येणार आहेत. शिळफाटा परिसरातील विद्यार्थी डोंबिवलीतील शाळांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी जाणार आहेत.
या विद्यार्थ्यांना कोंडी मुक्त रस्ते असतील तर ते योग्य वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचणार आहेत. परंतु, नेहमीप्रमाणे शिळफाटा रस्त्यावरील ते कल्याणमधील शिवाजी चौक परिसरातील मेट्रो मार्गाची कामे सुरू ठेवली तर तेथील कामाच्या यंत्रणेमुळे कोंडीतून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत अवघड होणार आहे. हे रस्ते दहावी, बारावी परीक्षांच्या काळात मोकळे असावेत यासाठी कल्याण, डोंबिवलीतील शिळफाटा रस्ता, कल्याण शहरातील मेट्रो मार्गाची, कल्याण मुरबाड मार्गावरील काँँक्रीट रस्त्यांची कामे परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी रिक्षा संघटनेचे माळेकर यांनी केली आहे.
रिक्षांंमधून विद्यार्थी वाहतूक
परीक्षेच्या काळात अनेक पालक आपल्या मुलाला परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी कायमस्वरुपी रिक्षा भाड्याने निश्चित करून ठेवतात. काही खासगी वाहनाने प्रवास करतात. कल्याण, डोंबिवलीत प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक रिक्षांवर अवलंबून असतात. या कालावधीत रस्त्यांवर वाहतूक कोंडी असेल तर रिक्षा चालकांना परीक्षा केंद्रापर्यंत विद्यार्थ्यांना वेळेत पोचविणे शक्य होणार नाही. दहावी, बारावी हे विदयार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचे टप्पे आहेत. विद्यार्थी हिताचा विचार करून दहावी, बारावीच्या २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीतील परीक्षा काळात कल्याण, डोंबिवलीतील मेट्रो मार्गाची कामे पूर्णता बंंद ठेवावीत. यामुळे विद्यार्थ्यांना झटपट रिक्षा, खासगी वाहने परीक्षा केंद्रापर्यंत पोहचणे शक्य होणार आहे, असे पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
रस्ते कामे थांबवा
कल्याण, डोंबिवलीत एमएमआरडीएकडून सीमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. या कामांचे सामान घेऊन मिक्सर, डम्पर, हायवा, पाण्याचे टँकर शहरात धावत असतात. त्यामुळे शहरात कोंडी होते. ही कामेही परीक्षा कालावधीत काही दिवस थांबवावित. काही शाळांच्या परिसरात काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत. तेथे परीक्षा केंद्रावर जाताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेण्याची मागणी रिक्षा संघटनेने एमएमआरडीए, वाहतूक उपायुक्त यांच्याकडे केली आहे.

