डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा इमारती, चाळी, व्यापारी गाळे उभारणाऱ्या भूमाफियांवर कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांनी मागील २५ वर्षात ६०० हून अधिक महाराष्ट्र प्रादेशिक नगरनियोजन आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्याने पालिका हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने मागील अनेक वर्षात एकाही भूमाफियांवर पोलिसांकडून कारवाई झाली नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम उभारणी थांबत नाही. यासाठी ‘एमआरटीपी’ गुन्हे दाखल भूमाफियांची प्रकरणे बाहेर काढुन याप्रकरणातील भूमाफियांवर कारवाई करण्यासाठी कल्याण, डोंबिवली पोलीस ठाण्याच्या स्थानिक वरिष्ठांना आदेश द्यावेत, अशी मागणी येथील मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मंगेश कुसुरकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेकडे केली आहे.
बेकायदा बांधकामे करणाऱ्या भूमाफियांवर पालिकेकडून ‘एमआरटीपी’चे गुन्हे दाखल झाले की त्या अनुषंगाने चौकशी होऊन संबंधित भूमाफियांवर तातडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा होणे गरजेचे होते. मागील अनेक वर्षात कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा इमारती, चाळी, व्यापारी गाळे उभारणाऱ्या माफियांच्या विरुध्द स्थानिक पोलीस ठाण्यात ‘एमआरटीपी’ कायद्याने गु्न्हे दाखल केले. परंतु, नंतर या गुन्ह्यांचा तपास आणि या प्रकरणातील माफियांना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने पालिका, पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे वेळोवेळी भूमाफियांनी बेकायदा बांधकामे करण्यासाठी बळ मिळत गेले, असे ॲड. कुसुरकर यांनी पत्रात म्हटले आहे.
भूमाफिया अटकेत
गेल्या आठवड्यात डोंबिवली शहराच्या विविध भागात मागील अनेक वर्ष बेकायदा इमारती उभारणारा, आणि कोपर येथील एका बेकायदा बांधकाम प्रकरणी आणि पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या ‘एमआरटीपी’ गुन्ह्यातील आरोपी प्रफुल्ल गोरे या भूमाफियाला विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी अटक केली आहे. एका सराईत भूमाफियाला ‘एमआरटीपी’च्या गुन्ह्यात अटक करण्याची मागील अनेक वर्षातील ही पहिलीच आक्रमक कारवाई आहे.
विष्णुनगर पोलिसांप्रमाणे रामनगर, मानपाडा, टिळकनगर, कोळसेवाडी, खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपल्या पोलीस ठाण्यात दाखल एमआरटीपीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू करून या प्रकरणातील भूमाफियांना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली तर शहरातील माफियांना तो मोठा दणका असेल. ही कार्यवाही सुरू झाली तर शहरातील बेकायदा बांधकामांचे पेव कमी होऊ शकते, असे ॲड. कुसुरकर यांनी पत्रात म्हटले आहे.
बेकायदा बांधकामे थंडावली
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे न्यायालयाचे आदेश, न्यायालयाने वेळोवेळी बेकायदा इमारती भुईसपाट करण्याचे आदेश देऊन पालिकेने भुईसपाट केलेल्या बेकायदा इमारती यामुळे माफियांचे कंबरडे मोडले आहे. याशिवाय पालिकेने वेळोवेळी पालिका हद्दीतील बेकायदा चाळी भुईसपाट करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे माफियांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याने बेकायदा बांधकामे करण्यास आता माफिया पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. शहरातील बेकायदा बांधकामे उभारण्याची स्पर्धा आता काहीशी थंडावली आहे. कल्याण, डोंबिवली शहरे बेकायदा बांधकाम मु्क्त करण्यासाठी एमआरटीपीच्या गुन्ह्यातील भूमाफियांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना आपल्या पोलीस ठाण्यात दाखल असलेली एमआरटीपीची प्रकरणे बाहेर काढुन त्याची चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ॲड. कुसुरकर यांनी केली आहे. याप्रकरणी आपणाकडून आवश्यक कार्यवाही झाली नाहीतर याप्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागू, असेही ॲड. कुसुरकर यांनी सूचित केले आहे.
अनेक भूमाफियांनी एमआरटीपी गुन्हे दाखल करताना स्वता निराळे राहून त्या बांधकामांवरील मजूर कामगार, मुकादम यांना आरोपी म्हणून उभे केले आहे. त्यामुळे भूमाफिया मोकाट असल्याचे चित्र आहे.
