कल्याण : महावितरणची कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातील सेक्शन ऑफिस आणि पाॅवर हाऊस असलेली इमारत अतिधोकादायक झाली आहे. पालिकेच्या संरचनात्मक अभियंत्यांनी महावितरण कार्यालय असलेली इमारत अतिधोकादायक असल्याचा अहवाल पालिकेला दिला आहे. जीवित आणि इतर वित्त हानी टाळण्यासाठी ही इमारत जमीनदोस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे या इमारतीतील आपले कार्यालय रिकामे करावे, अशी नोटीस कल्याण डोंबिवली पालिकेच्या ‘क’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी शिवाजी चौकातील महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्यांना पाठवली आहे.
पालिका ‘क’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त थोरात यांनी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे, की कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातील नगरभूमापन क्रमांक १८३१ ब येथील मालमत्ता क्रमांक, घर क्रमांक ५३३, ५३४, ५३५, ५३६ यामध्ये आपले महावितरणचे कार्यालय आहे.
या इमारतीचे आयु्र्मान पाहता कल्याण डोंबिवली पालिकेने २०२२ मध्ये इमारतीचे पालिकेच्या पॅनेलवरील संरचनात्मक अभियंत्यांकडून या इमारतीच तपासणी करून संरचनात्मक अहवाल घेतला. या पाहणी व अहवालातून ही इमारत अतिधोकादायक झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे पालिकेने आपल्या अभिलेखात ही इमारत अतिधोकादायक म्हणून नोंद करून घेतली आहे.
या इमारतीत आपल्या कार्यालयाचा वाणिज्य वापर सुरू आहे. हा वापर बंद करून इमारत रिकामी करावी म्हणून यापूर्वीच आपणास कळविण्यात आले आहे. पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. ही दुर्घटना घडली तर नाहक जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पालिकेची ही नोटीस मिळाल्यापासून या इमातीचे मालक, भाडेकरू, भोगवटादार यांनी तातडीने या अतिधोकादायक इमारतीमधील आपल्या घरे, कार्यालयांमधील सामान, साहित्य, इतर वस्तू बाहेर काढाव्यात. आणि स्वत:हून ही इमारत जमीनदोस्त करून घ्यावी. आपणाकडून ही कृती वेळीच करण्यात आली नाहीतर या अतिधोकादायक इमारतीमुळे होणारी जीवित-वित्त हानी टाळण्यासाठी आपणास कोणतीही पूर्वसूचना न देता ही इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही पालिकेकडून केली जाईल, असा इशारा पालिकेने महावितरणला दिला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्ष शिवाजी चौकात वीज पुरवठ्याची नियंत्रक म्हणून ओळखली जाणारी इमारत आता जमीनदोस्त होणार आहे.
