डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदे शिवसेनेचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याचे नगरसेवक पद तातडीने रद्द करा, या मागणीसाठी तक्रारदाराने बुधवारपासून ठरल्याप्रमाणे मंबईत आझाद मैदान येथे भर पावसात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. म्हात्रे याच्यासह इतर दोन नगरसेविकांंचे नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रारदार उपोषणकर्त्याची मागणी आहे.

रमेश म्हात्रे याची तक्रार आपण सत्यप्रतिज्ञा पत्राद्वारे राज्य निवडणूक आयोग, कोकण विभागीय आयुक्त, आयुक्त, कल्याण डोंबिवली पालिका यांना केली आहे. आपली सत्यप्रतिज्ञा पत्राद्वारे केलेली तक्रार खोटी असेल तर या सर्व शासकीय यंत्रणांनी आपण खोटी तक्रार केली आहे म्हणून आपल्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून उपोषणकर्ते कल्पेश जोशी यांनी केली आहे.

याशिवाय डोंबिवली पश्चिमेतील शिंदे शिवसेना आणि भाजपच्या एका नगरसेविकेचा बेकायदा बांधकामाशी थेट संबंध आला आहे. त्यामुळे त्यांनीही कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी उमेदवारी अर्ज भरताना सत्यप्रतिज्ञा पत्राद्वारे खोटी माहिती निवडणूक आयोगाला देऊन दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांचीही नगरसेविका पदे रद्द (अपात्र) करण्याची मागणी उपोषणकर्ते जोशी यांनी राज्य निवडणूक आयोग, कोकण विभागीय आयुक्त, आयुक्त, कल्याण डोंबिवली पालिका यांच्याकडे केली आहे.

डॉक्टर मारहाण प्रकरणामुळे रमेश म्हात्रे न्यायालयीन आदेशावरून ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीमुळे आधारवाडी तुरूंगात आहेत. म्हात्रेचे डॉक्टर मारहाण प्रकरण राज्यभर गाजले आहे. त्याच्या अटकेच्या मागणी बरोबर त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची वैद्यकीय संघटना, स्त्री शक्ती महिलांची मागणी आहे. आता त्यांना अटक आणि न्यायालयीन कोठडी झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी खासगी डॉक्टर, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद, डोंबिवली महिला महासंघ आक्रमक आहे. याप्रकरणी या संघटनांनी जिल्हाधिकारी, आयु्क्त, पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

रमेश म्हात्रे याचा मुलगा प्रवीण म्हात्रे याने जुनी डोंबिवली भागात बनावट सात बारा उतारे तयार करून त्या जमिनीशी थेट संबंध नसताना आपले नाव त्या सात बारा उताऱ्यात घुसवले असल्याची जोशी यांची तक्रार आहे. या बनावट सात बारा उताराच्या जमिनीवर प्रवीण म्हात्रेसह समर्थकांनी बेकायदा इमारतीची उभारणी केली आहे. प्रवीण म्हात्रे हा रमेश म्हात्रे याचा मुलगा आहे. रक्ताच्या नात्यामधील व्यक्तीने बेकायदा बांधकाम केले तर त्याच्याशी संबंधित नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द होऊ शकते, असा शासनाचा नियम आहे. या नियमाप्रमाणे म्हात्रे याच्याप्रमाणे इतर दोन नगरसेविकांवर शासनाने तत्पर कारवाई करावी. गेल्या सात महिन्यापासून आपल्या तक्रार अर्जावर शासन कार्यवाही करत नाही म्हणून आपण हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे, असे उपोषणकर्ते कल्पेश जोशी यांनी संगितले. जोपर्यंत शासन म्हात्रेवर नगरसेवक पद रद्द करण्याची कार्यवाही करत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरू राहणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.