कल्याण: कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त आणि शून्य कचरा मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाकडून जनजागृती उपक्रम शहराच्या विविध भागात राबविले जात आहेत. पालिका हद्दीत ९० टक्क्याहून अधिक कचरा नागरिकांकडून ओला आणि सुका असा स्वतंत्रपणे विलग करून देण्यात येत असताना, कल्याण, डोंबिवलीतील अनेक सोसायट्या अशाप्रकारे कचरा विलग करून देत नसल्याने घनकचरा विभागाने अशा सोसायट्यांना दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील घोलपनगर भागातील काॅर्नर स्टोन सोसायटीला (२-ब) सलग चार दिवस तीन हजार रूपयांची कारवाई करून स्वच्छता अधिकाऱ्यांनी १२ हजार रूपये दंड ठोठावला.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रत्येक सोसायटी, चाळ, झोपडपट्ट्यांमधून ओला आणि सुका असा विलग करून कचरा मिळाला पाहिजे यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या आदेशावरून प्रभाग स्वच्छता अधिकारी घरोघर जाऊन ओला, सुका कचरा विलग करून देणे का महत्वाचे आहे याची माहिती नागरिकांना देत आहेत.
नगरसेवकांच्या मागणीवरून उपायुक्त कोकरे, स्वच्छता अधिकारी प्रभागांमध्ये जाऊन सार्वजनिक रस्त्यावर ओला, सुका कचऱ्याच्या विलगीकरणाची, घरातून बाहेर पडणारा विविध प्रकारचा कचरा पालिकेने दिलेल्या नियमानुसार आपल्या दारात येणाऱ्या घंटागाडी कामगाराकडे देणे किती महत्वाचे आहे याची माहिती नागरिकांना देत आहेत. या जनजागृती मोहिमेमुळे कल्याण डोंबिवली शहरातून ९० टक्के कचरा आता नागरिकांकडून विलग होऊन पालिकेला मिळत आहे.
सोसायटीला दणका
शून्य कचरा मोहीम आणि ओला, सुका कचरा विलग करण्याचा उपक्रम यशस्वीतेकडे वाटचाल करत असताना, पालिका हद्दीतील काही सोसायट्या मात्र अद्याप ओला, सुका विलग करून पालिकेकडे देण्यास टाळाटाळ करत आहेत. अशा सोसायटी पदाधिकाऱ्यांना स्वच्छता निरीक्षकांना नोटिसा देऊन आपण आपल्या सोसायटीतील कचरा विलग करून द्याव्या अशा सूचना केल्या आहेत. तरीही कल्याण पश्चिमेतील घोलपनगर भागातील काॅर्नर स्टोन (२ ब) सोसायटीतील रहिवासी ओला, सुका कचरा वेगळा करून देत नसल्याने स्वच्छता निरीक्षक संदीप भालेराव यांनी या सोसायटीतून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यावर ११ जुलै ते १४ जुलै २०२६ अशी पाळत ठेवली.
या चारही दिवशी काॅर्नर स्टोन इमारतीमधून ओला, सुका एकत्रितपणे पालिका कामगारांकडे देण्यात आला. त्यामुळे उपायुक्त कोकरे यांच्या आदेशावरून स्वच्छता निरीक्षक भालेराव यांनी या सोसायटीला प्रत्येक दिवशी तीन हजार रूपयांचा दंड ठोठावला. अशाप्रकारे १२ हजार रूपयांचा दंड या सोसायटीकडून चार दिवसात वसूल करण्यात आला.
गेल्या आठवड्यात टिटवाळा येथील रेजन्सी सर्वम सोसायटीला ओला, सुका कचरा विलग करून देण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याने घनकचरा विभाग अधिकाऱ्यांनी एक लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. १०० हून अधिक सदनिका असणाऱ्या सोसायट्यांनी आपल्या सोसायटी आवारात कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारून तेथेच कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अनेक सोसायट्या या नियमाची अंमलबजावणी करत नाही म्हणून घनकचरा विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
कल्याणमधील घोलपनगरमधील काॅर्नर स्टोन सोसायटीने ओला, सुका कचरा विलग करून पालिकेकडे देणे बंधनकारक आहे. तसेच सोसायटी आवारात स्वताची कचरा विल्हेवाट प्रकल्प यंत्रणा उभारून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष केल्याने या सोसायटीला दंड ठोठावण्यात आला आहे.
- रामदास कोकरे उपायुक्त, घनकचरा विभाग.
