KDMC titwala assistant commissioner jaywant chaudhary suspended: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळा ‘अ’ प्रभागातील साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी टिटवाळा, मांडा, बल्याणी परिसरातील बेकायदा बांधकामे रोखण्यात अपयशी ठरले. अखेर कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांनी साहाय्यक आयुक्त चौधरी यांना गुरुवारी तडकाफडकी पालिका सेवेतून निलंबित केले.
टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांना साहाय्यक आयुक्त चौधरी पाठिंबा देत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षापासून पालिका मुख्यालयात येत होत्या. आयुक्त गोयल यांना टिटवाळा सावरकर रस्त्यावरील डीजे वन चौकात रस्ते, पदपथाला अडथळा होईल अशा पद्धतीने भूमाफियांनी बेकायदा गाळे बांधल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आयुक्तांनी हे गाळे तोडून कार्यवाही अहवाल पाठविण्याचे आदेश चौधरी यांना दिले होते. त्यांनी या गाळ्यांवर कारवाई न करताच ते तोडल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला.
या अहवालाची खात्री करण्यासाठी गुरुवारी सकाळी आयुक्त गोयल अचानक टिटवाळा येथे डीजे वन चौकात गेले. तेथे गाळे यथास्थिती होते.आयुक्तांनी चौधरी यांना तात्काळ घटनास्थळी येण्याचे सूचवले. चौधरी घटनास्थळी उशिरा पोहोचले. आयुक्तांनी मुख्यालयात येऊन तात्काळ चौधरींच्या निलंबनाचे आदेश काढले. ‘लोकसत्ता’ने टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे व त्यांची चौधरींकडून पाठराखण हा विषय गेल्या वर्षापासून लावून धरला होता. नगरसेवक राहुल कोट यांनी चौधरी यांना निलंबित करण्यासाठी आयुक्तांना पत्रे दिली होती.
बेकायदा बांधकामांतून दौलतजादा
अनेक वर्षे लेखा विभागात कार्यरत चौधरी यांच्यावर आयुक्तांनी टिटवाळा ‘अ’ प्रभागाची जबाबदारी सोपवली होती. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर चौधरी यांनी फेरीवाला, बेकायदा बांधकामांची पाठराखण केली. तसेच भूमाफियांना आशीर्वाद देण्यास सुरुवात केली. मागील दीड वर्षात टिटवाळा प्रभागात एकही बेकायदा बांधकाम उभे राहिले नव्हते. यापूर्वी तोडलेली व नव्याने बेकायदा बांधकामे उभी राहू देण्यात चौधरी यांनी मोठा हातभार लावल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. स्थानिक पोलीसही या बांधकामात हिस्सेदार असल्याचे काही प्रकरणांत दिसून आले होते.
या बेकायदा बांधकामांमधून मिळालेल्या दौलतजाद्यामधून अतिक्रमण नियंत्रण पथकातील एका कामगाराने रोख रकमेतून जेसीबी (खननयंत्र) खरेदी केला. एका अधिकाऱ्याने रोख रकमेतून अंबरनाथ भागात एक सदनिका खरेदी केल्याची विश्वसनीय माहिती आहे.
विधानसभेत प्रश्न
टिटवाळा परिसरात एक हजार बेकायदा चाळी उभारल्या राहिल्या आहेत. या बांधकामांना साहाय्यक आयु्क्त जयवंत चौधरी पाठबळ देत असल्याचा प्रश्न गेल्या विधिमंडळ अधिवेशनात आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम पथकाने टिटवाळ्यातील ४००हून अधिक बेकायदा चाळी एका दिवसात जमीनदोस्त केल्या होत्या. टिटवाळ्यात एकही बेकायदा बांधकामे उभे राहू नये, असे आदेश पालिका वरिष्ठांनी वेळोवेळी देऊनही, त्या आदेशाचे पालन चौधरी यांनी केले नाही. पालिका हद्दीत एकही बेकायदा बांधकाम उभे राहू न देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. न्यायालय, पालिका वरिष्ठांच्या आदेशाचे चौधरी यांनी पालन केले नाही. बेकायदा बांधकामांची पाठराखण करत असल्याच्या ठपका ठेवत आयुक्त गोयल यांनी चौधरी यांना सेवेतून निलंबित केले.
वरिष्ठांकडून पाठराखण
गेल्या मार्चमध्ये मालमत्ता कर वसुली लक्ष्यांक पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने आयुक्तांनी चौधरी यांच्यावर कारणे दाखवा नोटीस देऊन निलंबनाचा बडगा उगारण्यात आला होता. त्यावेळी चौधरी यांनी पालिका मुख्यालयात जाऊन एका उपायुक्तांच्या दालनात चक्कर येऊन पडल्याचा बहाणा केला होता. मुख्यालयातील एक अति वरिष्ठ, दोन महिला वरिष्ठ, एक सर्वोच्च पदाधिकारी चौधरींची नियमित पाठराखण करत होते, अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
