कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेचा एक लिपिक भरत संजय पाटोळे गुरूवारी दुपारी एका शाळेच्या संस्था चालकांकडून अग्निशमन विभागाची ना हरकत परवानगी देण्यासाठी ४० हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या ३० वर्षात कल्याण डोंबिवली पालिकेत लाच घेताना पकडलेले भरत पाटोळे ४८ वे लाचखोर कर्मचारी आहेत.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर ‘एसीबी’चे पोलीस निरीक्षक संतोष नावलगी यांच्या तक्रारीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या कार्यालयात भरत पाटोळे लिपिक टंकलेखक म्हणून कार्यरत आहेत. पाटोळे यांचा अग्निशमन विभागाशी प्रशासनस्तरावर थेट संबंध नसताना त्यांनी अग्निशमन विभागाचे ना हरकत देण्याचे धाडस केले कसे.
अग्निशमन विभाग प्रमुखांना डावलून भरत पाटोळे हे काम परस्पर कसे करत होते, असे प्रश्न यानिमित्ताने प्रशासनात उपस्थित झाले आहेत. अशाप्रकारच्या अग्निशमन विषयक किती ना हरकत प्रमाण (एनओसी) भरत यांनी मागील काही वर्षात दिल्या आहेत, याचीही चौकशी होण्याची मागणी आता पुढे येत आहे.
सापळा लागला
कल्याणमधील साई इंग्लिश शाळेला अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला पाहिजे होता. यासाठी या संस्थेच्या संचालकांनी भरत पाटोळे यांच्याशी संपर्क केला. पाटोळे याने या कामासाठी ३० हजार रूपये रक्कम देण्याची मागणी केली. या संस्थेची गरज ओळखून पाटोळे यांनी ही रक्कम ४० हजार रूपये केली. ती रक्कम देण्यासाठी आग्रह कायम ठेवला.
साई इंग्लिश शाळेच्या चालकांनी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाला दिली. २७ एप्रिल रोजी पाटोळ अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी ४० हजार रूपये मागत असल्याची खात्री ‘एसीबी’च्या पथकाला पटली. पथकाने तक्रारदार शाळा चालकांना पावडर लावून नोटा दिल्या. गुरूवारी ही रक्कम स्वीकारण्याचे पाटोळे याने मान्य केले. ‘एसीबी’च्या पथकाने पाटोळे भोवती सापळा लावला होता. ही रक्कम स्वीकारण्याच्या ठिकाणी पाटोळे आले. त्यांनी शाळा चालकांकडून ४० हजाराची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना झडप घालून अटक केली.
पाटोळे यांचा प्रवास
भरत पाटोळे यांचे वडील पालिकेच्या अग्निशमन विभागात नोकरीला होते. त्यांच्या जागी भरत हे अनुकंपा तत्वावर दहा वर्षापूर्वी शिपाई म्हणून लागले. शिक्षण, तत्परता यामुळे भरत यांनी लिपिक पदापर्यंत मजल मारली. तीन वर्षापूर्वी भरत यांना शिपाई पदावरून लिपिक पदावर बढती मिळाली. अग्निशमन विभागात असताना भरत यांचे काही कारनामे त्रासदायक ठरू लागल्याने आणि तेथे त्यांचा उपद्रव वाढल्याने भरत यांची बदली पालिका मुख्यालयात विधि विभागात करण्यात आली.
कामाचा उरक असल्याने गेल्या वर्षी त्यांची बदली अतिरिक्त आयुक्त गोडसे यांच्या कार्यालयात करण्यात आली होती. अग्निशमन विभागाशी थेट कोणताही संबंध नसताना या विभागाला डावलून भरत परस्पर अग्निशमन विभागाचे ना हरकत दाखले कसे देत होता. यासाठी त्यांना कोणाचे पाठबळ होते. अग्निशमन दलाची एनओसी घेण्यासाठी नियमानुसार दीड हजार ते दोन हजार शुल्क असते. मग भरत यांनी अशा कामांसाठी ४० हजार घेतले, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
