कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला, गोविंदवाडी परिसरातील पालिकेच्या गटारांमध्ये आपल्या म्हशींच्या तबेल्यांमधील शेण, मलमूत्र थेट सोडून सार्वजनिक स्वच्छतेत अडथळा आणणाऱ्या, तसेच अशाप्रकारे अस्वच्छता करू नका म्हणून नोटिसा देऊनही त्याचे पालन न करणाऱ्या गोविंदवाडी परिसरातील २१ म्हशीच्या तबेले मालकांविरूध्द कल्याण डोंबिवली पालिकेच्या क प्रभागाचे स्वच्छता अधिकारी जितेंद्र यादव यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण संवर्धन कायद्याने २१ तबेले मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत शून्य कचरा मोहीम, स्वच्छ सुंदर कल्याण, डोंबिवली उपक्रम यशस्वी करण्यासाठी पालिकेचा घनकचरा विभाग उपायुक्त रामदास कोकरे यांच्या पुढाकाराने प्रयत्नशील आहे. देशातील पहिल्या दहा क्रमांकाच्या यादीत स्वच्छतेत कल्याण डोंबिवली पालिकेचा क्रमांक यावा म्हणून पालिका प्रशासन गेल्या तीन वर्षापासून प्रयत्नशील आहे. शहरात सार्वजनिक स्वच्छतेचे सर्व उपक्रम यशस्वी होत आहेत.

अशा परिस्थितीत कल्याण पश्चिमेतील म्हशींचे तबेल्यांचे आगर असलेल्या गोविंदवाडी, दुर्गाडी किल्ला भागातील अनेक तबेले मालक म्हशींचे शेण, मलमूत्र विशिष्ट प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावत नाहीत. याऊलट पालिकेच्या गोविंदवाडी भागातून गेलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारात म्हशींचे शेण, मलमूत्र सोडून देतात. यामुळे गोविंदवाडी, दुर्गाडी किल्ला भागातील गटारे नियमित तुंबतात. या गटारांमधील सांडपाण्यासह म्हशींचे मलमूत्र दररोज रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते.

याविषयी या भागातील अनेक नागरिक पालिकेकडे तक्रारी करतात. या तक्रारींची दखल घेऊन पालिका क प्रभागाचे घनकचरा विभागातील कामगार या भागात नियमित स्वच्छता करतात. या भागातील तबेले मालक तबेल्यांमधील शेण थेट गटारात सोडतात. त्यामुळे गोविंदवाडी भागातील गटारे नियमित तुंबतात. या भागात त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरते. हे स्वच्छता अधिकारी जितेंद्र यादव यांच्या निदर्शनास आले.

यादव यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. उपायुक्त कोकरे यांच्या आदेशावरून स्वच्छता अधिकारी जितेंद्र यादव यांनी गोविंदवाडी भागातील २१ तबेले मालकांना म्हशींच्या तबेल्यांमधील शेण, मलमूत्र थेट नाल्यात सोडू नये म्हणून नोटिसा दिल्या. त्याचे पालन करण्यासाठी सूचना केली होती. तरीही या नोटिसीचे पालन न करता २१ तबेले मालक पालिका अधिकाऱ्यांना न जुमानता, कायद्याला न घाबरता तबेल्यांमधील शेण दररोज गटारात सोडत होते. यामुळे गोविंदवाडी भागातील सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला होता.

२१ तबेले मालक

अखेर उपायुक्त कोकरे यांच्या आदेशावरून स्वच्छता अधिकारी यादव यांनी सार्वजनिक स्वच्छतेत अडथळा आणणाऱ्या गोविंदवाडी भागातील तबेले मालक शरफुद्दीन कर्ते, अनस मौलवी, मकसुद खोत, शाहिद मौलवी, अफसर मौलवी, सलीम पठाण, फलीम मौलवी, इतलाक मौलवी, हमजा मौलवी, शादाब मौलवी, मौनी मीरसिंद, निसार मौलवी, जलील डोन, इरफान कर्ते, मुजम्मील कर्ते, एजाज कर्ते, मजाज मौलवी, मुंडविल कारेल, सरवर मौलवी आणि गुलाम अकबर कर्ते यांच्या विरूध्द तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. उपायुक्त कोकरे यांच्या धाडसी, आक्रमकपणामुळे मागील अनेक वर्षात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने तबेले मालकांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.