कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता पालिका हद्दीत मोक्याच्या जागेत भव्य आकाराचे ११६ फलक (होर्डिंग) लावणाऱ्या ७४ जाहिरात संस्था, खासगी आस्थापना, गृहप्रकल्प कंपन्या यांची बेकायदा होर्डिंग्ज तोडण्याची मोहीम बुधवारपासून सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मागील ३० वर्षाच्या कालावधीत प्रथमच पालिकेने पालिका हद्दीतील बेकायदा होर्डिंग्जविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

या होर्डिंग्ज लावणाऱ्या आस्थापना, कंपन्या, एजन्सी चालकांना पालिकेने मागील काही महिन्यापूर्वी शहरातील आपली बेकायदा होर्डिंग्ज काढून घेण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांप्रमाणे आपण स्वताहून आपली होर्डिंग्ज काढून घेतली नाहीतर पालिका ते बेकायदा होर्डिंग्ज तोडून टाकील, असा इशारा पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उपायु्क्त वंदना गुळवे यांनी होर्डिंग्ज आस्थापन मालकांना दिला होता.

परंतु, हा होर्डिंग्ज तोडण्याचा खर्च लाखो रूपयांच्या घरात असल्याने कोणीही आस्थापना, एजन्सी मालकाने स्वताहून होर्डिंग्ज काढून घेतले नाही किंवा या होर्डिंग्ज संदर्भात पालिकेशी संपर्क साधला नाही.त्यामुळे पालिकेच्या मालमत्ता विभागाने वर्तमानपत्रात या बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्या मालक, होर्डिंग्ज लावलेल्या ठिकाणांची माहिती देऊन आस्थापना, एजन्सी चालकांना आम्ही आता या बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करतो, असा जाहीर इशारा दिला आहे.

अनधिकृत होर्डिंग्जमुळे नुकसान

पालिका हद्दीत एकूण ३७२ होर्डिंग्ज आहेत. त्यातील १२८ होर्डिंग्ज पालिका मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता उभारण्यात आली आहेत. परवानाधारी होर्डिंग्जची संख्या २४४ आहे. परवान्याची मुदत संपलेल्या होर्डिंग्जची संख्या ७८ आहे. परवानाधारी होर्डिंग्ज मालकांकडून पालिकेला आतापर्यंत १३५ कोटी ८० लाखाचे येणे बाकी आहे. अनधिकृत १२८ होर्डिंग्ज मालकांकडून एक पैशाचा महसूल पालिकेला मिळत नाही. त्यामुळे पालिका हद्दीतील मोबाईल टाॅवर आणि भव्य होर्डिंग्ज विषयावर तीन महिन्यापूर्वी एक तदर्थ समिती महासभेने नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती.

या समितीने शहरातील बेकायदा होर्डिंग्जमुळे पालिकेचे कोट्यवधी नुकसान होत असल्याचे निष्कर्ष नोंदवले. प्रशासनाने या बेकायदा होर्डिंग्ज चालकांनाती नियमानुकूल करून घेण्यासाठी मुदत दिली होती. १२८ मधील फक्त २१ जणांनी पालिकेशी संपर्क साधला होता. होर्डिंग्ज हा पालिकेचा महसुली उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तोडून टाकण्याचे तदर्थ समितीने प्रशासनाला सुचवले आहे.

प्रशासनाचा इशारा

पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या अल्ट्राटेक, सीबीएसजी, थारवाणी, देवी महालक्ष्मी काॅलेज, मँगा पॅरेल, अरिहंत, शक्ती ग्रुप, स्मार्ट, जय डिक्लेअर, बालाजी ॲनेक्स काॅम्पलेक्स, एसएसएल ॲडव्हटाॅयझिंग, सुंदर क्लासेस, राज गॅलेक्सी, लाईफ स्टाईल एमिनिटीस, रेजन्सी, सोनम क्लासेस, राधा कृष्ण नेत्रालय, कुलस्वामिनी ग्रुप, पेराडाईज ग्रुप, मिडिया वाईस, बनिमॅक्स लाईफ, स्टॅनफोर्ड इंग्लिश स्कूल, स्वामी नारायण सिटी, रूस्तमजी अर्बन, ईशा वुमन हाॅस्पिटल, व्हिनस स्काय, लाॅन्डमार्क ऑरिस्ट, देवानगी, लोढा, त्रिमूर्ती एन्टप्रायझेस, टेलेक्स, कोहिनूर, सुमित पावशे, देवानगी, रेजन्सी ग्रुप अशा एकूण ७४ जाहिरात संस्था, मालकांच्या बेकायदा होर्डिंग्जवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये ही बेकायदा होर्डिंग्ज आहेत.

ही होर्डिंग्ज तोडण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च पालिकेला येणार होता. त्यामुळे एका ठेकेदार संस्थेला हे होर्डिंग्ज तोडण्याचे काम देण्यात आले आहे. या संस्थेने हे तोडकाम करून त्यामधील भंगार विकून त्यांचा खर्च काढायचा आहे. त्यामुळे पालिकेवर ही होर्डिंग्ज तोडण्यासाठी एक पैशाचा बोजा पडणार नाही.

पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ११६ अनधिकृत होर्डिंग्ज आढळली आहेत. संबंधितांना ही होर्डिंग्ज काढून काढण्यासाठी कळवले होते. विहित मुदतीत ही होर्डिंग्ज न काढल्याने पालिकेकडून ही होर्डिंग्ज निष्कासित करण्याची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. संबंधित संस्थांना तसे जाहिरपणे कळविण्यात आले आहे. -वंदना गुळवे उपायुक्त, मालमत्ता विभाग.