कल्याण – कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका, नांदिवली तर्फ, मलंग रस्ता, १०० फुटी रस्ता परिसरातील रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या २०० फेरीवाल्यांवर सोमवारी पालिकेच्या आय, ड प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकांनी संयुक्तपणे कारवाई केली. यावेळी फेरीवाल्यांचे पदपथ अडवून उभारलेले १५० हून मंच, निवारे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. कल्याण पूर्व भागात गेल्या १५ दिवसाच्या अवधीत झालेली ही तिसरी मोठी कारवाई आहे.
यापूर्वी कल्याण पूर्वेत अशाप्रकारची कारवाई सुरू झाली की स्थानिक नगरसेवक, पुढारी, स्थानिक गावगुंड या कारवाईत अडथळा आणत होते. आता पालिका अधिकारी आक्रमक होत पोलीस, कमांडो पथक असा जामानिमा घेऊन कारवाई करत असल्याने या कारवाईत अडथळा आणला तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होण्याची भीती असल्याने कोणीही या कारवाईत अडथळा आणत नाही.
आयुक्त अभिनव गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे निर्देशावरून अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या ड प्रभाग परिसरातील चक्की नाका ते नांदीवली तर्फ, मलंग रस्ता, तसेच पूर्व भागातील १०० फुटी रस्ता परिसरात महापालिका मुख्यालयाचे पथक, ड प्रभाग कार्यालय आणि आय प्रभाग कार्यालय यांच्या फेरीवाला हटाव पथकांमार्फत सोमवारी दिवसभरात फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त डाॅ. सुनील लोंढे, अधीक्षक राजेंद्र साळुंखे, ड प्रभागाचे साहाय्यक आयुक्त उमेश यमगर, अधीक्षक नितीन चौधरी सहभागी झाले होते.
सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर दुकानांच्या पुढे वाढविण्यात आलेले भाग, अनधिकृत फेरीवाले तसेच विविध प्रकारची अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईत सुमारे १५० हून अधिक हातगाड्या, लोखंडी मंच, ठेले जेसीबीच्या साहाय्याने जागीच तोडण्यात आले. ४० पावसाळी निवारे तोडून टाकण्यात आले. याशिवाय ८ सायकली, गॅस सिलेंडर, 3 गॅस शेगड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या गॅरेज धारकांना तात्काळ अतिक्रमण काढून टाकणेबाबत सक्त ताकीद देण्यात आली. या व्यतिरिक्त वाहतुक विभागाच्या सहकार्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २५ दुचाकी व चारचाकी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतुक विभागाकडून हवालदार व्ही.व्ही.साळुंखे आणि वाहतूक सेवक ललित प्रसाद यांनी सहकार्य केले. महापालिकेमार्फत सार्वजनिक रस्ते, पदपथ व वाहतुक मार्ग अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या संयुक्त कारवाई यापुढेही नियमित सुरु राहणार असून, नागरीक, व्यावसायिक, फेरीवाले व आस्थापना धारकांनी नियमांचे पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले.
