कल्याण – राज्यात दुष्काळाचे सावट अधिक गंभीर होऊन शेतकऱ्यांची होत असलेली होरपळ पाहून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने १ ऑक्टोबर रोजीचा पालिकेचा वर्धापनदिन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमारे २५ लाखाचा खर्च दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणुन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही दुष्काळ साहाय्यतेची घोषणा महापौरांनी केली. पालिका स्थायी समिती सभागृहात पालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
एल निनोमुळे यावेळी पावसासह वातावरणात अनेक प्रकारचे चढ उतार येत आहेत. आता लागवड केलेल्या पिकांना पावसाची गरज असताना पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पीके करपून जात आहेत. हातातोंडाशी आलेले पीक करपून गेल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. येणाऱ्या काळात मुबलक पाणी नसेल तर पीके कशी घ्यायची, पशुधनासाठी चारा, पाणी कोठुन आणायचा, असे प्रश्न दुष्काळाचे सावट असलेल्या भागातील शेतकऱ्यांसमोर आहेत.
ही सर्व दुष्काळग्रस्तांची परिस्थिती पाहता, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, नागरिक हेही आपले बांधव आहेत. हा विचार करून कल्याण डोंबिवली पालिकेने यावेळी १ ऑक्टोबर रोजी होणारा आपला वर्धापनदिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्धापनदिनाच्या माध्यमातून पालिकेने २५ लाख रूपयांचा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे, असे महापौर ॲड. चौधरी यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने उचललेले हे लहान पाऊल आहे.
पालिका वर्धापनदिनाचे औचित्य साधून वर्ग ४ मधील सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली. यावेळी उपमहापौर राहुल दामले, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, सभागृह नेते वरुण पाटील, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सारिका जाधव, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, भाजप गटनेते शशिकांत कांबळे, इतर पालिका सदस्य, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त वंदना गुळवे, साहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, उपायुक्त विराज लबडे उपस्थित होते.
