कल्याण : मागील २५ ते ३० वर्षे कल्याण-डोंबिवली पालिकेत चतुर्थ श्रेणी संवर्गात काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी पदवी, टंकलेखन व इतर शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यामुळे अशा उच्चश्रेणी प्राप्त पालिकेतील चतुर्थ श्रेणी संवर्गातील २२ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्तीची पत्रे महापौर ॲड. हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आली.

पालिकेत चतुर्थ श्रेणी संवर्गात सेवा केल्यानंतर उच्चश्रेणी अर्हता प्राप्त केल्याने आपणास पालिका प्रशासनाने पदोन्नत्ती दिल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. या कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती देण्याच्या प्रक्रियेसाठी आयुक्त अभिनव गोयल, सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे व सहकारी कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.मागील ३० ते ३५ वर्षापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेत अनेक कर्मचारी दहावी, बारावी उत्तीर्ण वा तत्सम शैक्षणिक अर्हता प्राप्त करून शिपाई, बहुद्देशीय कामगार, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, मुकादम या चतुर्थ श्रेणीतील विविध संवर्गात कार्यरत होते. नोकरी करत असताना या कर्मचाऱ्यांनी दूरस्थ शिक्षण पद्धतीने, मुक्त विद्यापीठातून आपले पदवीचे शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादन केल्या होत्या. काहींनी टंकलेखन, लघुलेखन, संगणक शिक्षण, एमएच सीआयटी अशा अनेक शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्या होत्या.

पदोन्नत्तीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्याने कर्मचारी संघटनेचे बाळ हरदास, सचिन बासरे, सुरेश तेलवणे या पदाधिकाऱ्यांनी अशा चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती देण्याची मागणी अनेक वर्ष प्रशासनाकडे चालू ठेवली होती. या मागणीचा विचार करून व चतुर्थ श्रेणीतील २२ कर्मचाऱ्यांनी त्यांनी लिपिक पदाची अर्हता प्राप्त केल्यामुळे पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशी नुसार बुधवारी महापौर ॲड. हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, शिवसेना गटनेते नगरसेवक विश्वनाथ राणे, भाजप गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, उपायुक्त वंदना गुळवे, महिला व बालकल्याण सभापती सारिका जाधव, सचिव किशोर शेळके यांच्या उपस्थितीत चतुर्थी श्रेणी विविध संवर्गातील २२ कर्मचाऱ्यांना वर्ग तीन श्रेणीतील लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नत्तीची नियुक्ती पत्रे देण्यात आली.

याशिवाय अग्निशमन प्रणेता (लिडींग फायरमन) या वर्ग चार संवर्गात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यास “उप अग्निशमन केंद्र अधिकारी” या वर्ग-3च्या पदावरील पदोन्नतीचा आदेश प्रदान करण्यात आला.फोटोओळपालिका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नत्तीची नियुक्ती पत्रे देताना महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले.