कल्याण – प्रशासकीय शिस्तीच्या बाबतीत अतिशय काटेकोर असलेले कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल गुरूवारी फेरीवाला, अतिक्रमणे, गणेशोत्सव मंडळ परवानग्या, नागरी विषय या प्रश्नांवरून प्रभाग साहाय्यक आयुक्तांच्या स्थळ आणि दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीत गुरूवारी साहाय्यक आयुक्तांवर प्रचंड संतप्त झाले. एका महिला साहाय्यक आयुक्ताला तर आयुक्तांनी तात्काळ निलंबित करण्याची तंबी दिली. दर महिन्याला फेरीवाले, बेकायदा बांधकामे विषयावर किमान पाच फौजदारी (एफआयआर) गुन्हे प्रत्येक प्रभाग साहाय्य्क आयुक्तांनी केलेच पाहिजेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

साहाय्यक आयुक्त लक्ष्य

आयुक्त गोयल यांचा बैठकीतील रूद्रावतार पाहून प्रभाग साहाय्यक आयुक्तांमध्ये काही वेळ अस्वस्थता पसरली. पालिकेतील दोन सर्वाेच्च पदाधिकाऱ्यांनी आयुक्त गोयल यांना प्रभागातील साहाय्यक आयुक्त फक्त फेरीवाले, बेकायदा बांधकामांमधून हप्ते वसूल करण्यात व्यक्त असतात. नागरिकांची कोणत्याही प्रकारचे कामे ते करत नाहीत. नागरिकांच्या पत्रांना उत्तरे देत नाहीत. त्यामळे या प्रभाग साहाय्यक आयुक्तांवर आपण कठोर कारवाई करा, अशा तक्रारी केल्या. हे प्रभाग साहाय्यक आयुक्त बेकायदा बांधकाम दिसले की तेथे धावत जातात आणि ते बांधकाम न तोडता तेथे जुगाड करून पुन्हा माघारी फिरतात, असे एका पदाधिकाऱ्याने आयुक्तांना सांगितले. नेहमीच किरकिर करणाऱ्या डोंबिवलीतील सत्ताधारी पक्षातील एका किरकिऱ्या नगरसेवकाने आयुक्तांना काही विषयांवर व्यक्तिगत पातळीवर टिप्पणी केल्याने आयुक्त गोयल सर्वाधिक भडकले. त्यांनी त्या नगरसेवकाला आपल्या शब्दात सुनावून, त्या बैठकीत आयुक्त ताडकन निघून गेल्याची पालिकेत चर्चा आहे.

आयुक्तांचा रूद्रावतार

प्रभाग साहाय्यक आयुक्त काहीच काम करत नाहीत, असे पालिकेतील सर्वाेच्च पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे अप्रत्यक्ष तो सांगावा आपणास आणि ती आपलीच जबाबदारी असल्याचे लक्षात आल्याचे निदर्शनास आल्यावर आयुक्त गोयल यांनी गुरूवारी प्रभाग साहाय्यक आयुक्तांची पालिका मुख्यालयात स्थळ दर्शक आणि दूरदृश्यप्रणालीतून आढावा बैठक घेतली. आयुक्तांनी शहरातील सर्व रस्ते, पदपथ फेरीवाला मुक्त आणि चालण्यासाठी मोकळे असले पाहिजेत असे सांगितले. फेरीवाल्यांची पाठराखण करत असल्याची एकही तक्रार आली तर साहाय्यक आयुक्तांना निलंबित केले जाईल अशी तंबी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली.

निलंबित करणार

एकेक साहाय्यक आयुक्ताशी बोलताना कल्याण पूर्वेतील एक महिला साहाय्यक आयुक्त आपणास राजकीय मंडळींकडून कारवाई करताना कसा त्रास होतो याचे तुणतुणे वाजवित होत्या. आयुक्तांनी संतप्त होऊन सामान्य प्रशासन उपायुक्त वंदना गुळवे यांना ‘त्या’ साहाय्यक आयुक्ताला यांना तातडीने निलंबित करण्याची सूचना केली. नंतर हा विषय निवळला. त्यामुळे संबंधित साहाय्यक आयुक्त कारवाईतून थोडक्यात बचावल्या. ‘आपणास काम जमत नसेल तर मग नोकरीचा राजीनामा देऊन राजकीय पक्षात सहभागी व्हा,’ असे आयुक्तांनी संतप्त सुरात सांगितले. इतर साहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी फेरीवाले, बेकायदा बांधकामे विषयांवरून फैलावर घेतले.

‘एफआयआर’ करा

फेरीवाले, बेकायदा बांधकामांची अजिबात पाठराखण होता कामा नये. नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लागली पाहिजेत. एकही विषय मुख्यालयापर्यंत येता कामा नये. प्रभागस्तरावर नागरिकांची कामे प्राधान्याने मार्गी लागली पाहिजेत, असे आयुक्तांनी साहाय्यक आयुक्तांना सांगितले. दर महिन्याला फेरीवाले, बेकायदा बांधकामे आणि इतर गैरगोष्टी करणाऱ्यांवर किमान पाच फौजदारी गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल झालेच पाहिजेत, असे सक्तीवजा निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.