कल्याण – मालमत्ता कर थकबाकी आणि पाणी देयक वसुलीसाठी पालिका प्रशासन आक्रमक झाले आहे. वारंवार सूचना देऊनही आणि अभय योजना लागू होणार नाही हे जाहीर करूनही अनेक धनदांडगे मालमत्ता कर आणि पाणी देयक शुल्क थकबाकीदार कराचा, पाणी देयक शुल्काचा भरणा पालिका तिजोरीत करत नाहीत.

त्यामुळे टिटवाळ्यातील रेल्वे स्थानक भागातील रिजन्सी सर्वम या गृहसंकुलाचा मालमत्ता कर थकबाकी आणि पाणी देयक शुल्क थकबाकीमुळे पालिकेच्या अ प्रभाग पथकाने पाणी पुरवठा खंडित केला आहे, अशी माहिती पालिका मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.या कारवाईमुळे मालमत्ता कर, पाणी देयक थकविणाऱ्या जमीनदार, विकासक यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसात पालिकेने एक हजाराहून अधिक विकासक, जमीनदारांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी सील केल्या आहेत. विहित वेळेत या थकबाकीदारांनी कर भरणा केला नाही तर या मालमत्तांचा लिलाव करून त्यामधून थकित रक्कम वसूल करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. याशिवाय दोनशेहून अधिक जणांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.

टिटवाळ्यात कारवाई

टिटवाळा रेल्वे स्थानक भागातील रिजन्सी सर्वम या गृहसंकुलातील सदनिकाधारकांकडे मालमत्ता कराची पालिकेची एक कोटीची थकबाकी आहे. याशिवाय रिजन्सी सर्वम गृहसंकुलाच्या एकूण ३५ इमारतींच्या पाणी देयकाची ५० लाखाची रक्कम थकित आहे. ही रक्कम भरणा करावी म्हणून रिजन्सी सर्वमच्या व्यवस्थापनाला, गृहसंकुल चालकांना पालिकेच्या अ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित नोटिसा, प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मालमत्ता विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निर्देशावरून अ प्रभाग अधिकाऱ्यांनी रिजन्सी सर्वम संकुलाचा पाणी पुरवठा खंडित केला.

मालमत्ता भुईसपाट

टिटवाळ्यात अनेक मालमत्ताधारकांनी पालिकेची मालमत्ता कराची थकित रक्कम भरणा केली नाही. अशा मालमत्तांच्या आस्थापना, रहिवासी नसलेल्या मालमत्ता आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशावरून जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या. टिटवाळ्यात अशाप्रकारची मोठी कारवाई करण्यात आली. कर भरणा केला नाहीतर पालिका आता जेसीबीच्या साहाय्याने मालमत्ता जमीनदोस्त करू लागल्याने थकबाकीदार विकासक, जमीनदारांची तारांबळ उडाली आहे.

३१ मार्चपर्यंत अशी कारवाई करून थकित मालमत्ता कर आणि पाणी देयक शुल्क रक्कम वसुल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.डोंबिवलीत एका धनदांडग्या विकासकाने मालमत्ता कराची रक्कम थकवली होती. या धनदांडग्या विकासकाकडे पालिकेचे पथक कर वसुलीसाठी गेले तेव्हा याविकासकाने पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.

पण पालिकेच्या वरिष्ठांनी या धनदांडग्याला आपल्या भाषेत सुनावताच नरमलेल्या या धनदांडग्याने दुसऱ्या दिवशी पालिका तिजोरीत लाखो रूपयांचा थकित रकमेचा कर भरणा केला, अशी पालिका मुख्यालयात चर्चा आहे. अनेक विकासक, जमीनदार हे काही नगरसेवकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे कारवाई झाली तर आपला नातेवाईक नगरसेवक हे प्रकरण मिटून टाकेल असा गैरसमज काही जमीनदार, विकासकांचा आहे. त्यामुळेही पालिकेला अशी थकित कर रक्कम वसूल करताना अडचणी येत असल्याची चर्चा आहे.