कल्याण – कल्याण पूर्वेतील बाहुबलींचे वर्चस्व असलेल्या आडिवली, ढोकळी आणि चिंचपाडा भागातील मोकळ्या जागा, पदपथ, रस्ते अडवून सुरू केलेले बेकायदा बाजार कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागाच्या तोडकाम पथकाने दोन दिवसांपूर्वी राजकीय दबावाला बळी न पडता दोन जेसीबींच्या साहाय्याने जमीनदोस्त केले, ही कारवाई सुरू असताना काही स्थानिक राजकीय मंडळींनी दबाव आणून कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दबावाला बळी न पडता आय प्रभागाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी या भागातील सर्व बेकायदा अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप वैद्यकीय कारणाने रजेवर आहेत. त्यामुळे अधीक्षक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आता आय प्रभागातील बेकायदा बाजार, फेरीवाले आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू झाली आहे. अधीक्षक साळुंखे हे बेकायदा बांधकामांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात. टिटवाळा अ प्रभागात असताना वडवली भागातील बाहुबलींना न जुमानता त्यांची बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्याचे धाडस केले होते. याचा त्यांना त्रास झाला. पण त्याला न जुमानता त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. डोंबिवली ग प्रभागातही त्यांनी असेच धाडसाने काम केले होते.

बेकायदा बाजारपेठा जमीनदोस्त

आडिवली, ढोकळी, चिंचपाडा भागात काही भूमाफियांनी या भागातील मोकळ्या जागा हडप करून तेथे निवारे उभे करून फरसाण दुकान, मटण मासे विक्री दुकाने, भंगार साठ्याची गोदामे, लोखंड भंगार बाजार अशा बाजारपेठा सुूरू केल्या आहेत. या बाजारातून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नाही, अशी माहिती अधीक्षक साळुंखे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली. त्यावेळी पदपथ, रस्ते, मोकळ्या जागा अडवून, वाहतुकीला अडथळा येईल अशा पध्दतीने हे निवारे उभे करून, बांधकामे करून या बाजारपेठा सुरू करण्यात आल्याचे पाहणी पथकाला समजले. दोन दिवसापूर्वी अधीक्षकांनी तोडकाम पथक, दोन जेसीबी घेऊन आडिवली, ढोकळी, चिंचपाडा भागात अचानक हे बेकायदा बाजार हटविण्याची कारवाई सुरू केली.

ही कारवाई सुरू होताच दुकान चालकांची पळापळ झाली. या भागातील २० हून अधिक पक्की बेकायदा बांधकामे, निवारे अतिक्रमण नियंत्रण पथकाने जमीनदोस्त केले. या कारवाईसाठी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या निर्देशावरून कोळसेवाडी पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त होता. यावेळी अधीक्षकांना काही स्थानिक राजकीय मंडळी, बाहुबलींनी संपर्क करून कारवाई रोखण्याची मागणी केली. आपण पालिका वरिष्ठांच्या आदेशावरून ही कारवाई करत आहोत, असे सांगून साळुंखे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. अतिक्रमणाने वेढलेला भाग मोकळा केल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

आय प्रभाग हद्दीतील बेकायदाबाजार, फेरीवाले, अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे नियोजन केले आहे. टप्प्याने ही सर्व बेकायदा बांधकामे वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे पावसाळा सुरू होण्याच्या आत जमीनदोस्त करून पदपथ, रस्ते नागरिकांना चालण्यासाठी खुले राहतील असे नियोजन आहे. – राजेंद्र साळुंखे अधीक्षक, आय प्रभाग.