कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागातील टिटवाळा बल्याणी भागात १ हजाराहून अधिक बेकायदा चाळी भूमाफियांनी उभारल्या आहेत. या बेकायदा चाळींना स्थानिक राजकीय मंडळींचा आशीर्वाद आहे. निष्क्रिय म्हणून ठपका बसलेले आणि आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीवरून निलंबनाची प्रक्रिया केलेले जयवंत चौधरी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आहेत. चौधरी यांच्याकडून या बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांवर कारवाई होत नसल्याने गुरूवारी सकाळी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी स्वताह तोडकाम पथकासह टिटवाळा बल्याणी भागात दाखल झाले. या भागातील ७० सर्व नव्या, जुन्या बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या.
एवढ्या बेकायदा चाळी उभ्या राहत असताना आठ महिन्यात अ प्रभाग साहाय्यक आयुक्त चौधरी यांनी या बेकायदा चाळी भुईसपाट करण्याची कारवाई का केली नाही, असे प्रश्न आता पालिका वरिष्ठांना पडले आहेत. आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबनाची प्रक्रिया केलेले चौधरी यांना प्रशासन पाठबळ का देत आहे, असे प्रश्न स्थानिक नागरिक करत आहेत. पालिकेच्या एका सर्वोच्च पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने चौधरी अ प्रभागात पुन्हा स्थानापन्न झाल्याची चर्चा आहे.
ताफा दाखल
टिटवाळा बल्याणी भागात १००० हून अधिक बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या भागात दररोज १० हून अधिक चाळींची उभारणी होते, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांना समजली होती. या वरिष्ठांनी साहाय्यक आयुक्त भारत पवार, प्रसाद ठाकुर, उमेश यमगर, सचिन तामखेडे, प्रीती गाडे आणि तोडकाम पथक, दोन जेसीबी यांचा ताफा घेऊन गुूरूवारी सकाळी अचानक बल्याणी गाठले. टिटवाळा पोलिसांना रात्रीच या कारवाईची माहिती देऊन बंदोबस्ताची मागणी केली होती. या मागणीप्रमाणे कारवाईच्यावेळी पोलीस बळ उपलब्ध होते.
कारवाईने पळापळ
बल्याणी भागात अ प्रभाग साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या समक्ष गेल्या आठवडाभरात उभारण्यात आलेल्या अनेक चाळी पाहून कारवाई पथक आश्चर्यचकित झाले. कारवाई पथकाने रिकाम्या नवीन, जुन्या बेकायदा चाळी भुईसपाट केल्या. या भागात बहुतांशी परप्रांतीय, तुर्भे, मस्जिद, मालाड, अंधेरी भागातून आलेले मुस्लिम समुदायातील रहिवासी होते. चालू बांधकामांवरील कामगार सामान टाकून पळून गेले. भूमाफिया गायब झाले.
भूमाफियांचा नेता हजर
कारवाई सुरू असताना या भागातील एक राजकीय पुढारी कारवाईच्या ठिकाणी येऊन ‘तुम्ही माझ्याच भागाला तोडकामासाठी लक्ष्य का करता,’ असे प्रश्न करून कारवाई थांबविण्याची मागणी केली. आम्ही रिकाम्या बेकायदा चाळी तोडत आहोत, असे अधिकारी सांगू लागले. या राजकीय पुढाऱ्याची पत्नी आता पालिकेत नगरसेविका आहे. या पुढाऱ्याचा बेकायदा चाळींशी थेट संबंध असल्याने त्याच्या पत्नीचे नगरसेवक रद्द करण्यासाठी काही मंडळी पुढाकार घेणार आहेत.
पोलीस अधिकारी सरसावला
पालिकेची तोडकामाची कारवाई आक्रमकपणे सुरू असताना असताना टिटवाळा पोलीस ठाण्याचा एक पोलीस अधिकारी घटनास्थळी घाईने आला. या कारवाइने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगून तो अधिकाऱ्यांना तेथून निघून जाण्याचा सल्ला देऊ लागला. पोलिसांनीच नांगी टाकल्याने अखेर पालिकेचे कारवाई पथक ७० चाळी तोडून पुन्हा पालिकेत परतले. या हालचालींवरून स्थानिक पोलिसांना बेकायदा चाळींपेक्षा सुव्यवस्थेची अधिक काळजी असल्याचे स्पष्ट झाले.
चौधरींना निलंबित करा
या बेकायदा चाळी उभ्या राहण्यात आणि त्यांची पाठराखण करण्यात साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचा मोठा वाटा असल्याने त्यांना आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित करावे, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत. चौधरी टिटवाळ्यात काम करत असले तरी त्यांचे निम्मे लक्ष डोंबिवली फ प्रभाग हद्दीत काय चालले आहे याकडे अधिक असते अशी चर्चा आहे.
