ACB Raid Scare In KDMC: कल्याण डोंबिवली पालिकेची नगरसेवक राजवटीमधील पहिली स्थायी समिती सभा शुक्रवारी (ता. २४) येथील पालिका मुख्यालयात होती. दुपारपासून अधिकारी वर्ग या सभेत व्यस्त होता. संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान स्थायी समितीची सभा संपली.

सदस्य, अधिकारी, कर्मचारी घरच्या वाटेवर निघाले. तेवढ्यात पालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पालिका काही अधिकाऱ्यांच्या दालनाभोवती घुटमळत असल्याची वार्ता पालिका मुख्यालयात वाऱ्यासारखी पसरली. आणि आपला दुपारचा रिकामा भोजनाचा डबा कार्यालयात ठेऊन, दालनातील विजेचे दिवे, पंखे, वातानुकूलित सयंत्र बंद न करताच पालिका अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपले दालन सोडून पसार झाले.

पालिका प्रशासकीय मुख्यालयाचा पहिला मजला ते दुसऱ्या माळ्यापर्यंत संध्याकाळी साडे पाच वाजून गेल्यानंतरही कार्यालयीन वेळ संपली तरी विकासक, वास्तुविशारद, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि काही विशेष नागरिक, माध्यम प्रतिनिधी यांनी गजबजेला असतो. नगररचना कार्यालय तर रात्री नऊ तर कधी दहा वाजेपर्यंतही सुरू असते.

‘एसीबी’वाले आले

स्थायी समितीची सभा संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान संपली. अधिकारी वर्ग स्थायी समिती सभागृहाकडून आपल्या दालनाकडे वळले. कर्मचारी वर्ग घरच्या दिशेने निघाला होता. तेवढ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पालिका मुख्यालय प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यापासून ते दुसऱ्या माळ्यापर्यंत घुटमळत असल्याचे आणि पालिकेत नेहमीच रडारवर असलेल्या एका दुय्यम अतिवरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनाभोवती ते सापळा लावून असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पालिका आवारात आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या व्हाॅटसप, मोबाईल संदेशाव्दारे पसरली.

ही वार्ता ऐकून अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. प्रत्येक खाते प्रमुखाने आपल्या दालनात टेबलावर रेंगाळत बसलेल्या कर्मचाऱ्याला तात्काळ आहे त्या परिस्थितीत दालन सोडून बाहेर पडण्याचे गुपचूप निर्देश दिले. अभियंत्यांना ही माहिती समजताच ते जीव मुठीत घेऊन निघून गेले.

संभ्रमाचे वातावरण

अधिकारी, कर्मचारी घाईने आपले दालन सोडून बाहेर निघून गेले. त्यांच्या दालनाबाहेर घिरट्या घालणारे नागरिक, विकासक, वास्तुविशारद यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येकजण उत्सुकतेने अचानक अधिकारी, अभियंते, वरिष्ठ दुय्यम अधिकाऱ्यांची दालने का बंद झाली. येथे बसलेला कर्मचारी वर्ग घाईने का निघून गेला याची चर्चा करू लागला. स्थायी समिती संपल्याने अधिकारी आपल्या दालनापर्यंत पोहचले होते. हे अधिकारीही नंतर निघून गेले.

रात्री उशिरा पालिकेत नेहमीच रडारवर असलेल्या एका दुय्यम वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात काहीतरी गडबड झाल्याची जोरदार चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्या अधिकाऱ्यावर प्रसंग ओढावला. पण त्याने तो मोठ्या कौशल्याने निभावला अशी सांगोपांगी चर्चा सुरू झाली होती.

नंतर हा अधिकारी कुठे आहे याची खात्री अनेकांनी केल्यावर तो अधिकारी सुखरूपणे आपल्या घरी पोहचला असल्याचे खात्रीलायकरित्या समजले. त्यानंतर लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पालिकेत आले होते, पण तो अधिकारी कुणकुण लागल्याने सापळा फसला असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होती.

म्होरे जाळ्यात

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील पाच दिवसात नवी मुंबईचे अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त डाॅ. कैलास गायकवाड, जिल्हा परिषद शिक्षण विभागातील दोन लाचखोर लिपिक यांना लाच घेताना पकडले आहे.

एसीबी विभाग एकदम आक्रमक झाला असल्याने त्याची भीती कल्याण डोंबिवली पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे. कडोंमपात गेल्या ३० वर्षात एकूण ४७ अधिकारी, कर्मचारी लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले आहेत. लाचखोर महापालिका म्हणून कडोंमपाचा सर्रास उल्लेख होतो.