कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १ लाख १९ हजार ४६४ मालमत्ताधारकांनी जून अखेरपर्यंत ४८ कोटी ७२ लाखाचा कर भरणा ऑनलाईन माध्यमातून केला आहे. सहजसुलभ पध्दतीने ही कर भरण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक या कर भरणा प्रक्रियेला सर्वाधिक पसंती देत आहेत, असे मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे दोन लाखाहून मालमत्ता कर धारक आहेत. सन २०२५-२०२६ या वर्षात मालमत्ता कर वसुलीचा लक्ष्यांक ६०० कोटी आहे. मार्च २०२७ अखेरपर्यंत पालिकेला ही मालमत्ता कर वसुली पूर्ण करायची आहे. यापूर्वी डिसेंबर संपून पालिका अर्थसंकल्प तयार करण्याचे वारे वाहू लागले की आयुक्त मालमत्ता कर वसुलीसाठी बैठकांवर बैठका, मालमत्ता कर अधिकारी प्रभागांमध्ये जाऊन मालमत्ता कर, साहाय्यक आयुक्तांना कामाला लावून मालमत्ता कर वसुलीसाठी कामाला लावायचे.

परंतु, मालमत्ता कर वसुलीचा गेल्या वर्षापासून पदभार स्वीकारल्यापासून उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी अतिशय संयमित आणि नियोजनबध्दरितीने मालमत्ता कर वसुली कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू केली आहे. गेल्या वर्षी पालिकेने मालमत्ता कर वसुलीच्या जवळपास वसुली केली. यावेळी एप्रिलपासूनच मालमत्ता कर वसुली विहित वेळेत होईल यादृ्ष्टीने उपायुक्त चव्हाण यांनी नियोजन केले आहे. मालमत्ता कर नागरिकांना घर, कार्यालयात बसून भरता यावा म्हणून ऑनलाईन माध्यमातून, क्युआर कोड पध्दतीच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरात जाऊन तेथे स्थापित पध्दतीने मालमत्ता कर भरणा वसुली करता येईल यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके पाठविण्यात आली आहेत. ही देयके नागरीकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या केडीएमसी.काॅम.ईन या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ३१ जुलै, २०२६ पर्यंत कराचा भरणा करणा-या नागरीकांना मालमत्ता करात (शासकीय कर वगळून) पाच टक्के सवलतीची सुविधा प्राप्त होणार आहे. तसेच, ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराचा भरणा केल्यास दोन टक्के सवलत प्राप्त होणार आहे.

महानगरपालिकेने मालमत्ता कर भरण्यासंदर्भात नागरिकांना वेळोवळी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. यावेळी प्रथमच जून २०२६ अखेरपर्यत मालमत्ता करापोटी सुमारे १०० कोटीचा भरणा करदात्यांनी महानगरपालिकेच्या तिजोरीत केला आहे. यामध्ये एकूण १ लाख १९ हजार ४६४ करदात्यांनी ४८ कोटी ७२ लाखाचा भरणा ऑनलाईन माध्यमातून केला आहे. मागील वर्षी जून २०२५ पर्यंत मालमत्ता करापोटी ६७ कोटी ८८ लाखाचा भरणा पालिका तिजोरीत झाला होता.