कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा नागरिक, शाळकरी मुलांवर हल्ला होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर या भटक्या कुत्र्यांच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, शासनाचे आदेश याचा विचार करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या विषयावर प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा यासाठी पालिकेच्या येत्या सोमवारी (ता. १६) होणाऱ्या पहिल्याच महासभेत भटक्या कुत्र्यांचा विषय उपस्थित करण्यात आला आहे.
भाजपचे डोंबिवलीतील मोठागाव येथील नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी हा विषय महासभेत विषयपत्रिकेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत पालिकेत प्रशासकीय राजवट होती. अधिकाऱ्यांवर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व नसल्याने भटक्या कुत्र्यांच्या विषयावर नागरिकांच्या तक्रारींची पालिकेने कधी गांभीर्याने दखल घेतली नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर प्रशासकीय अनास्था?
पालिकेत भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताविषयी तक्रारी केल्या की श्वान निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचारी पालिकेचे वाहन भटके कुत्रे पकडण्यासाठी टिटवाळा येथे गेले आहे. ते कधी येईल हे सांगता येत नाही अशी उत्तरे देत होते. अन्य नागरिकांनी अशाच पध्दतीने श्वान निर्बिजीकरण केंद्रात संपर्क केला की भटके कुत्रे पकडण्यासाठी पालिकेचे वाहन पलावा, शिळफाटा भागात गेले आहे, असे उत्तर दिले जात होते. प्रत्यक्षात पालिकेच्या कल्याण मधील पत्रापूल बाजार समितीजवळील श्वान निर्बिजीकरण केंद्रात भटके श्वान पकडण्यासाठी दोन वाहने आहेत. त्यामधील एक वाहन नेहमीच बंद असल्याच्या तक्रारी आहेत. पालिका हद्दीत दोन निर्बिजीकरण केंद्र प्रस्तावित असताना एकच जुनाट केंद्र सुरू आहे.
या श्वान निर्बिजीकरण केंद्रावर कोणाचे लक्ष नसल्याने या केंद्रात अनागोंदी कारभार सुरू होता. या श्वान निर्बिजीकरण केंदातील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी माहिती अधिकारी कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी पालिका प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन या निर्बिजीकरण केंद्रातील नियंत्रक पर्यवेक्षक कर्मचारी गेल्या वर्षी आयुक्तांनी निलंबित केला आहे. अनेक प्राणी मित्रांनी पालिका निर्बिजीकरण केंद्रातील कामाविषयी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांना पकडून आणून त्यांची नसबंदीची प्रक्रिया नियमित होणे आवश्यक असताना, या केंद्रातील कर्मचारी खोटे आकडे दाखवून पालिका प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
महासभेत चर्चा
पालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न विचारात घेऊन भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे या गंभीर विषयावर महासभेत चर्चा घडवून आणून, महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी प्रशासनाला भटक्या कुत्र्यांच्या विषयावर ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्याची मागणी करणार आहेत. मागील पाच वर्षापासून या निर्बिजीकरण केंद्रावर आरोग्य विभागाचे लक्षच नव्हते. या मनमानीमुळे शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न निर्माण झाल्याचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
९० हजार भटके कुत्रे
पालिका हद्दीत ९० हजार भटके कुत्रे आहेत. मागील तीन वर्षात ४८ हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली आहे. मागील तीन वर्षात ५१ हजार जणांना श्वान दंश झाला आहे. एक हजार १७६ जणांना रेबिजची लागण झाली आहे. मागील चार वर्षात भटक्या कुुत्र्यांच्या निर्बिजीकरण आणि लसीकरणावर पालिका आरोग्य विभागाने एकूण चार कोटी २३ लाख ८४ हजार रूपयांचा निधी खर्च केला आहे. डोंबिवलीतील जागरूक नागरिक विवेक पाठक आणि मनोज कुलकर्णी यांनी पालिकेतून मागविलेल्या माहितीमधून ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
