कल्याण : संत साहित्याचे अभ्यासक, अध्यात्मिक मनसेचे डोंबिवलीतील नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे कल्याण डोंबिवली पालिकेच्या महासभेत कोणताही विषय मांडताना त्या विषयानुरूप अभंगांचे एखादे चरण सभागृहाला ऐकून दाखवितात. त्या अभंगाच्या बोधाप्रमाणे सभागृहात नागरी समस्या, विकास, पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविणारा विषय मागील आठ महिन्यापासून मांडतात. पालिकेचे आर्थिक नुकसान करणारा कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातील पालिकेचे गाळे भाड्याने देण्याचा प्रशासनाकडील विषय सभागृहात मांडत असताना, नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी अंभगाने सुरूवात करताच, महापौर ॲड. हर्षली चौधरी यांनी त्यांना रोखले. अभंग न बोलता थेट विषयाला सुरूवात करा, असे सुनावले. यावरून सभागृहात गदारोळ सुरू झाला.

मनसेचे नगरसेवक सभागृहात शिंदे शिवसेनेच्या सोबत आहेत. नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे अभ्यासपूर्ण अभंग गाऊन विषयाची मांडणी करत असल्याने सभागृह नेहमीच त्यांचे स्वागत करते. मागील आठवड्यात स्थगित महासभेतील कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातील पालिकेचे दोन बांधिव गाळे भाड्याने देण्याचा विषय सभागृहात मंजुरीला आला होता. पालिकेचे दोन मोक्याच्या ठिकाणचे गाळे कमी दराने भाड्याने देण्याऐवजी ते चढ्या दराने भाड्याने देण्यात यावे. यामुळे पालिकेचा महसूल वाढण्यास साहाय्य होईल, असे प्रल्हाद म्हात्रे यांचे म्हणणे होते.

गाळ्यांचा मुद्दा अभंगातून मांडण्यास आक्षेप

प्रल्हाद म्हात्रे यांनी कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातील पालिकेच्या मालकीचे बांधिव क्षेत्राचे ७,५२ चौरस मीटर, ८,८२ चौरस मीटर दोन गाळे शाहबाज सलीम शेख यांना पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार १० वर्ष कालावधीसाठी भाडे तत्वावर देण्याचा महासभेत वाचून दाखविला. १० लाख ३९ हजार एवढे मूल्यांकन असलेल्या या मालमत्तेचे दोन्ही गाळ्यांचे ५९ हजार ५६ एवढे वार्षिक भाडे मोक्याच्या जागेवरील या गाळ्यांचा विचार करता खूप कमी आहे. पालिकेचा महसूल वाढीचा विचार करता या गाळ्यांचे भाडे अधिक असणे आवश्यक आहे, असे प्रश्न नगरसेवक म्हात्रे सभागृहाला करत होते. हे बोलत असताना ते फक्त काही सेकंद मी अभंगाचे चरण बोलून विषयाला सुरूवात करतो, अशी विनंती महापौरांना करत होते. अशाप्रकारे यापूर्वी शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे सभागृहात अभंग, शेर बोलून विषयाला सुरूवात करायचे. महापौर चौधरी यांनी इशारा देणारी सभागृहातील घंटा वाजवून म्हात्रे यांना अभंग गाण्यास विरोध केला.

सर्व नगरसेवकांचा म्हात्रेंना पाठिंबा

सभागृहातील शिंदे शिवसेनेसह सर्वच नगरसेवक, नगरसेविका म्हात्रे यांना अभंग बोलून द्यावा यासाठी आग्रही होते. शिंदे शिवसेनेच्या एक नगरसेविकेने आपण प्रत्येक नगरसेवकाला महासभेत प्रत्येक वेळी का बोलून देण्यास विरोध करता. अशा प्रकाराने आम्ही आमचे विषय सभागृहात कधी मांडायचे, असे प्रश्न केले. नगरसेवक महेश गायकवाड अभंग बोलून द्यावा यासाठी गळ घालत होते.

उपमहापौर राहुल दामले यांनी सभागृह शिस्तीने चालावे अशी अपेक्षा नगरसेवकांकडून केली. प्रल्हाद म्हात्रे यांचा विषय चर्चेला असताना सचिव किशोर शेळके यांनी तो मंजूर झाल्याचे महापौरांच्या सूचनेवरून पुढील विषयाला सुरूवात केली. त्याला नगरसेवक मंदार हळबे यांनी हरकत घेतली. अखेर या गदारोळात म्हात्रे यांना अभंग बोलू न देता गाळ्यांचा विषय गदारोळात मंजूर करण्यात आला.

पालिकेचे आर्थिक नुकसान करून सहजानंद चौकातील दोन मोक्याच्या ठिकाणचे गाळे पालिकेने भाड्याने देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे याविषयी आपण आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आणि शासनाच्या नगरविकास विभागाकडेही यासंदर्भात तक्रार करणार आहोत. – प्रल्हाद म्हात्रे, नगरसेवक, मनसे.