कल्याण – आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्याचा कालावधी राहिला की मालमत्ता कर, पाणी देयक वसुलीसाठी पालिकेची यंत्रणा, मालमत्ता कर विभाग रात्रंदिवस काम करतो. कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात प्रभाग साहाय्यक आयुक्त, मालमत्ता कर विभागाने दोन महिन्यात २०० कोटी मालमत्ता करवसुलीचे उद्दीष्ट्य ठेवले आहे. यामुळे सध्या साहाय्यक आयुक्तांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

चालू आर्थिक वर्षात प्रशासनाला ६०० कोटींचा मालमत्ता कर वसूल करायचा आहे. दररोज लाखाच्या हिशोबाने मालमत्ता करवसुली होणे शक्य नसताना ही कोट्यवधीची रक्कम दररोज कोठुन वसूल करायची, असे प्रश्न मालमत्ता कर अधिकारी व प्रभाग साहाय्यक आयुक्तांना पडले आहेत. ऑक्टोबरमध्ये १०० कोटी आणि नोव्हेंबर महिन्यात १०० कोटी करवसुली करायची असेल तर प्रभाग साहाय्यक आयुक्त, मालमत्ता कर विभाग कर्मचाऱ्यांना दररोज ३ कोटी ३३ लाख रूपये वसूल करावे लागणार आहेत. गेल्या आठवड्यात आयुक्तांनी सर्व प्रभाग साहाय्यक आयुक्त, मालमत्ता कर उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, साहाय्यक आयुक्त, मालमत्ता कर अधीक्षक यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी प्रत्येक प्रभागातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. ही वसुली समाधानकारक नसल्याचे सांगून करवसुली गतिमान करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत आयुक्तांनी ब प्रभागाचे कर अधीक्षक प्रमोद पाटील, शशी महाले यांना करवसुलीबाबत सूचना देण्यात आल्या. तर कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

प्रभागनिहाय करवसुली

आयुक्तांनी अ प्रभागासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबरसाठी १६ कोटी ८९ लाख, ब प्रभागासाठी १४ कोटी ७५ लाख, क प्रभाग ११ कोटी ५ लाख, जे प्रभाग ४ कोटी ७५ लाख, ड प्रभाग ५ कोटी ३० लाख, फ प्रभाग ३ कोटी ५४ लाख, ह प्रभाग ७ कोटी ५७ लाख, ग प्रभाग ३ कोटी ४५ लाख, आय प्रभाग ८ कोटी ९६ लाख, ई प्रभाग २४ कोटी १८ लाख लक्ष्यांक दिले आहेत.

…. तर शिस्तभंगाची कारवाई

वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे कर वसुली इष्टांक पूर्ण करण्यासाठी प्रभाग साहाय्यक आयुक्त, कर अधीक्षक यांनी योग्य नियोजन करावे. या कर वसुलीत निष्काळजीपणा, चालढकलपणा केली तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंग कारवाई केली जाईल. – योगेश गोडसे, अतिरिक्त आयुक्त.