कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या महासभेने कल्याण शहरातील सहजानंद चौकातील पालिकेच्या अखत्यारितील दोन गाळे कमी दराने एका व्यावसायिकाला भाड्याने देऊन पालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी आपण पालिकेच्या महासभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महासभेत आपणास बोलण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या याप्रकरणाची कसून चौकशी करावी, आणि याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डोंबिवलीतील मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी राज्याच्या नगरविकास प्रधान सचिवांकडे केली आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे पालिकेचे महसुली उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी पालिका प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी सतत प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत कल्याणमधील सहजानंद चौकातील पालिकेच्या अखत्यारितील मोक्याच्या जागेवरील मालकीचे दोन गाळे शाहबाज सलीम शेख यांना पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दहा वर्षासाठी भाड्याने देण्याचा विषय महासभेत मंजुरीला प्रशासनातर्फे आणण्यात आला होता.

१० लाख ३९ हजार एवढे मूल्यांकन असलेल्या या दोन्ही गाळ्यांचे वार्षिक भाडे ५९ हजार ५६ ठेवण्यात आले आहे. सहजानंद चौक ही कल्याण शहरातील महत्वाची आणि मोक्याची जागा आहे. याठिकाणचे वाणिज्य भाडे अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही गाळ्यांच्या माध्यमातून पालिकेला महसूल स्त्रोताचा विचार करून अधिक भाडे मिळवता आले असते. आताच्या भाड्याचा विचार करता, आणि जागेचा विचार केला तर महासभेने मंजुर केलेले भाडे खूप कमी आहे.

अभंगाच्या वादात गाळे भाड्याचा मुद्दा निकाली

याविषयी आपण आपले मत ‘असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने सुरूवात करून मांडणार होतो. पण, महापौर तथा पीठासीन अधिकारी ॲड. हर्षाली चौधरी यांनी आपणास अभंग बोलण्यास विरोध केला आणि त्यानंतर आपले मत मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर सभेत आपणास अभंग बोलण्यास केलेल्या विरोधावरून सभागृहात गदारोळ झाला. या गदारोळात पीठासन अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सचिवांनी हा गाळे भाडे देण्याचा विषय महासभेने मंजुर केला, असे म्हात्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दोषींना शिक्षा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही

पालिकेचा महसूल वाढला तर पालिका हद्दीत विकास कामे प्राधान्याने होणार आहेत. असा दूरगामी विचार करून मी हे पत्र आपणास देत आहे. या पत्राची गांभीर्याने चौकशी करावी. आणि कमी दराने भाडे देण्याची प्रक्रिया करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. हा विषय रद्द करण्यात यावा, तसेच या विषयाची सखोल चौकशी आणि दोषींना शिक्षा झाल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी दिला आहे.