कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात आणखी एक धक्कादायक प्रकार सुरू आहे. नगररचना विभागात ठाण मांडलेल्या सात ते आठ नगररचना अधिकारी, अभियंते यांची मुले नगररचना विभागात आपल्या बाबाने मंजूर केलेल्या नस्तींच्या (फाईल) माध्यमातून इमारती उभारणीची कामे करतात. मागील काही वर्षांपासून हा प्रकार नगररचना विभागात सुरू आहे. आपल्या मुलाच्या इमारत उभारणीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून काही ठराविक अभियंते नगररचना विभागात ठाण मांडून असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

पालिकेच्या नगररचना विभागात अनेक अभियंते नगररचनाकार, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, साहाय्यक अभियंते म्हणून १५ वर्षापासून कार्यरत आहेत. ठाणमांड्या या नगररचनाकार, अभियंत्यांची कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक नवीन इमारती, पुनर्विकासाच्या जुन्या इमारतींमध्ये विकासकांबरोबर छुपी भागीदारी आहे. आपल्या गृहप्रकल्पात कोठेही कोणत्याही प्रकारचा अडथळा नको म्हणून हे अभियंते, नगररचनाकार नगररचना विभागातून आपले पद सोडण्यास तयार नसतात. यापूर्वीच्या काही अधिकाऱ्यांनी नगररचना विभागातील आपले नगररचनाकार पद जाईल या भीतीने पदोन्नत्ती नाकारण्याचा प्रकार केला होता.

या प्रकाराची चौकशी झाली तर नगररचना विभागातील काही अभियंते, अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी अशाप्रकारे पालिकेतील एक साहाय्यक आयुक्ताची नोकरी खासगी कंपन्यांमधील भागीदारीमुळे गेली आहे. याचाही धसका या नगररचना अधिकाऱ्यांना आहे.

बाबा करतो फाईल मंजूर

नगररचना विभागातील सात ते आठ नगररचनाकार, अभियंते यांची मुले वास्तुविशारद, विकासक म्हणून शहरात काम करतात. बांधकाम, वास्तुशिल्प विभागाचे शिक्षण घेतलेली ही मुले स्वहिमतीने आपले प्रकल्प शहरात उभे करत असतात. त्यांना नगररचना विभागातील बाबांच्या पाठबळामुळे आणखी गती मिळते. या मुलांचे इमारत उभारणीचे प्रस्ताव या मुलांच्या बाबांनी पालिकेच्या नगररचना विभागात दाखल केले की ते तात्काळ मंजुरीची प्रक्रिया बाबा झटपट करून मोकळा होता. आणि मुलगा, मुलगी इमारत उभारणीच्या कामाला मोकळी होतात.

नगररचना विभागातील आपल्या बाबांच्या तालमीत तयार झालेली ही मुले कधीही पालिकेच्या नगररचना विभागात आपले इमारत उभारणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी किंवा शुल्क भरणा करण्यासाठी पाय ठेवत नाहीत. या विकासक, वास्तुविशारद मुलांचे बाबाच सगळी कामे आपल्या अखत्यारित करून घेतात, अशी माहिती आहे. सद्यस्थितीत नगररचना विभागातील सात ते आठ अभियंत्यांची मुले विकासक, वास्तुविशारद म्हणून सक्रिय आहेत.

हाताशी अधिकारी

अनेक विकासकांकडील इमारतीसाठी विकासाच्या भूखंडांमध्ये काही भौगोलिक, तांत्रिक अडचणी असतात. अशा भूखंडावर इमारत उभी करताना अडथळे येण्याची शक्यता असते. अशा गृहप्रकल्पांमध्ये नगररचनाकार छुपी भागीदारी घेऊन त्या भूखंडावरील सर्व अडथळे आपल्या पेनाने उलटापालट करून दूर करून त्या ठिकाणी इमारत उभारतात. यामध्ये विकासकाबरोबर नगररचनेतील अभियंत्यांचा लाभ होतो. अशा अनेक इमारती ॉकल्याण, डोंबिवलीत रस्तोरस्ती उभ्या आहेत. नगररचना अभियंत्यांच्या नावाने या इमारती ओळखल्या जातात.

आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन संबंधित नगररचना अभियंत्यांची चौकशीची मागणी काही जाणकार नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. यापूर्वी एका नगररचना अभियंत्याची जमीन मोजणीचे खासगी कार्यालय कल्याणमध्ये होते. ‘एसीबी’पर्यंत हा विषय गेल्याने झंझट टाळण्यासाठी या अभियंत्याने आपले जमीन मोजणीचे दुकान बंद केले असल्याचे समजते.