KDMC Town Planning Scam: कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात मनमानी पध्दतीने अधिकारी स्वताच्या नियुक्त्या करून घेत आहेत. आणि मनमानी करून इमारत बांधकाम परवानगीच्या नस्ती मंजूर करत आहेत. पालिकेच्या आकृतीबंधात नगररचना विकास अधिकारी (टीडीओ), उप अभियंता सारखी पदे मंजूर नसताना या पदाचे अधिकारी बांधकाम मंजुरीच्या नस्तींवर स्वाक्षऱ्या करून चुकीचे पायंडे नगररचना विभागात पाडत आहेत. या सर्व प्रकारामुळे वास्तुविशारद, विकासक हैराण आहेत. त्यामुळे या नियमबाह्य कारभाराची चौकशी करून या प्रकरणातील पालिका, नगररचना प्रमुखांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका जागरूक नागरिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात वरिष्ठांच्या आशीर्वादाने आणि नगररचना विभागातील एका मातबर अधिकाऱ्याच्या पुढाकाराने काही कनिष्ठ अभियंते या विभागात नियमबाह्यपणे दाखल होत आहेत. विशिष्ट अधिकाऱ्यांची एक टोळी नगररचना विभागात वर्षानुवर्ष आणि सध्या कार्यरत असल्याने इमारत बांधकाम मंजुरीचे प्रस्ताव झटपट मंजूर करणे, या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत अधिकचा महसूल जमा होईल असे प्रयत्न करण्याऐवजी नगररचना विभागातील अधिकारी आपल्या सोयीचा अभियंता आपल्या विभागात कसा असेल.
आपणास अडगळीचा अभियंता कसा बाहेर काढला जाईल यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे प्रशासकीय कामापेक्षा अनावश्यक कामात नगररचना विभागाचे अभियंते वेळ दवडत आहेत. या विभागावर प्रशासन प्रमुखाचे नियंत्रण नसल्याने नगररचना विभागातील गोंधळात आणखी भर पडली आहे, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे.
नियमबाह्य नियुक्त्या
मागील विधानसभा अधिवेशनाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागात टीडीओ, कार्यकारी अभियंता, उपअभियंता ही पदे आस्थापनेवर नसताना काही अधिकारी या पदावर काम कसे करतात. आणि ही पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी घेतली आहे का, असे प्रश्न केले होते. त्यावेळी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा कोणत्याही नियुक्त्या प्रशासनाने केल्या नसल्याचे जाहीर केले होते. यावेळी आमदार शिंदे यांनी मंत्री चुकीची माहिती सभागृहात देत असल्याचे सभागृहात सबळ कागदोपत्री पुराव्याने सांगितले होते, असे पत्रात नमूद केले आहे.
विधीमंडळातील विषयानंतर पालिका नगररचना विभागातील टीडीओ, उपअभियत्यांना बांधकामांच्या नस्तींवर स्वाक्षऱ्या करण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता हे अधिकारी पुन्हा आपली ‘खोंगळी’ भरण्यासाठी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेरील इमारत बांधकाम मंजुरीच्या नस्तींवर स्वाक्षऱ्या करत आहेत. आणि चुकीचे पायंडे नगररचना विभागात पाडत आहेत. पालिका नगररचना विभागात प्रचंड अनागोंदी सुरू आहे. ही अनागोंदी रोखण्यासाठी शासनानेच पुढाकार घेणे आवश्यक असल्याने आपण हे पत्र देत आहोत, असे जागरूक नागरिक जितेंद्र पुसाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘एसीबी’कडे तक्रार
कडोंमपा नगररचना विभागातील नियमबाह्य नियुक्त्या, पदस्थापनांची जागरूक नागरिक पुसाळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केल्याने नगररचना विभागातील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. केलेली काही चुकीची कामे झाकण्यासाठी मागील काही दिवसांपासून या विभागातील काही अभियंते प्रयत्नशील आहेत.
बांधकाम मंजुरीच्या काही नस्ती नगररचना विभागातून गायब असल्याच्या तक्रारी यापूर्वी झाल्या आहेत. अशा गायब नस्तींचा आकडा खूप मोठा असल्याची चर्चा आहे. दबदबा असलेले काही राजकीय मंडळी आपल्या बांधकाम मंजुरीच्या नस्ती झटपट मार्गी लावण्यासाठी आपले समर्थक अधिकारी या विभागात कायमस्वरुपी राहतील यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेचा एकही अधिकारी प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.
