डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा, कोपर परिसरातील बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त आणि ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने बेकायदा चाळी तोडण्याऐवजी संबंधित एक अधिकारी बुधवारी डोंबिवली पश्चिमेतील एका नगरसेवकाच्या घरी गेला. यावेळी तापट स्वभावाच्या या नगरसेवकाने संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेत ‘तुम्ही भूमाफियांकडून शेण माती खाता. त्यांना पाठबळ देता आणि तुम्ही अडचणीत आले की परत बेकायदा चाळी वाचविण्यासाठी आमच्या दारात का येता,’ असे सुुनावून या अधिकाऱ्याला हाकलून लावले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
गेल्या २५ दिवसापूर्वी आयुक्त अभिनव गोयल यांनी डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील देवीचापाडा स्मशानभूमी, मेंग्या आजो मंदिर, दार गणपती विसर्जन तलाव, अनमोलनगरी परिसर, कोपर भागातील म्हाळसाई चाळ परिसरातील सुमारे ७० हून अधिक बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वीस दिवसाच्या कालावधीत ही बांधकामे तोडण्याची जबाबदारी असलेला अधिकारी मी पालिका निवडणूक कामात खूप व्यस्त आहे, असा देखावा वरिष्ठांसमोर उभा करत होता. आता पालिका निवडणुका संपून १५ दिवस उलटले. तरीही हा अधिकारी आयुक्त गोयल, उपायुक्त भूमकर यांचे आदेश धुडकावून बेकायदा चाळींवर कारवाई करत नसल्याने पालिकेतील इतर साहाय्यक आयुक्त, कर्मचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. अशाने हा अधिकारी निलंबित होईल, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
नगरसेवकाच्या दारात
नेहमीच वजनदार राजकीय वातावरणात वावरणाऱ्या या अधिकाऱ्याला आता एकही लोकप्रतिनिधी, राजकारणी जवळ करत नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी या अधिकाऱ्याने डोंबिवली पश्चिमेतील काही भूमाफियांना संपर्क करून देवीचापाडा, कोपर परिसरातील बेकायदा चाळींच्या बातम्या थांबविण्यासाठी, पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न करा. मुंबईत आझाद मैदानात चाळींच्या विषयावरून कल्पेश जोशी बेमुदत उपोषणाला बसले आहेच. त्यांना उठविण्यासाठी सहकार्य करा. अन्यथा मी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर निलंबित होऊन माझा पालिकेतील नोकरीच्या प्रवासात खंड पडेल, अशी भीती काही लोकप्रतिनिधी आणि काही माफियांंकडे व्यक्त करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
अधिकाऱ्यामुळे पालिकेची बदनामी
ह प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण पथक, पोकलेन घेऊन कारवाई करण्याऐवजी हा अधिकारी नगरसेवक, काही वजनदार भूमाफिया, प्रतिष्ठांच्या दारात जाऊन आपल्यावर बेकायदा चाळी तोडण्याचे आलेले संकट दूर करण्यासाठी मला साहाय्य करा, असे आर्जव करत असल्याचे पाहून राजकारणी मंडळी आश्चर्य व्यक्त करत आहेत. कोणीही माफिया, नगरसेवक, लोकप्रतिनिधी या अधिकाऱ्याला पूर्वीसारखे साहाय्य करत नसल्याने या अधिकाऱ्याची बिकट अवस्था झाली आहे. या अधिकाऱ्याने आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे देवीचापाडा, कोपर भागातील बेकायदा चाळी भुईसपाट करून मोकळे होण्याऐवजी हा अधिकारी नगरसेवक, माफियांच्या दारात फिरत असल्याने इतर अधिकारी आश्चर्य आणि या सर्व प्रकरणात पालिकेची बदनामी होत असल्याने चिंता व्यक्त करत आहेत.
येणाऱ्या पहिल्याच महासभेत ह प्रभागातील एक अधिकारी आणि फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी, अ प्रभागातील दोन अधिकारी यांचे बेकायदा चाळी, फेरीवाल्यांची पाठराखण विषय चर्चेला येऊन त्यांच्यावर प्रशासनाकडून निलंबनासारखी कारवाई होण्याची शक्यता पालिकेतील उच्चपदस्थाकडून व्यक्त केली जात आहे.

