कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळतात की नाही याचे सर्वेक्षण डोंबिवली शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी केले. यावेळी संस्था स्वयंसेवकांना पालिका शाळांमधील पिण्याच्या टाक्यांमध्ये गाळ आणि अस्वच्छता असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षिततेचा विचार करून काही आवश्यक सुधारणा महापालिका शाळांमध्ये होणे आवश्यक आहे, अशा सूचना करणारा अहवाल स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांना सादर केला.
युथ फॉर एज्युकेशन आणि सीजेपी या स्वयंसेवी संस्थांकडून कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांच्या सर्वेक्षण अहवालाचे महापौरांकडे सादरीकरण यावेळी करण्यात आले. महापालिका प्राथमिक शाळांमध्ये स्वयंसेवकांनी केलेली प्रत्यक्ष पाहणी आणि त्या सर्वेक्षणातील निष्कर्ष महापौर ॲड. चौधरी यांना सांगण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये महानगरपालिका हद्दीतील क्रांतिवीर भगतसिंग प्राथमिक विद्यालय, आनंदीबाई जोशी प्राथमिक विद्यालय, उस्ताद बंदे अली खान उर्दू माध्यम शाळा, महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, सोनुभाऊ बसवंत प्राथमिक विद्यालय या शाळांचा समावेश करण्यात आला होता.
पालिका शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे सर्वेक्षणात आढळले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्याचा विचार केला तर शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अस्वच्छ आणि तळाला गाळ साचला असल्याचे आढळले. शाळा आणि परिसराची स्वच्छता, तसेच शाळेच्या जुन्या इमारतींची संरचनात्मक परिक्षण करून घेण्याची सूचना संस्था कार्यकर्त्यांनी महापौरांना केली. विशेषतः आनंदीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविणे, सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था करणे, शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता व गाळ काढणे, शाळांसाठी नियमित व स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देण्याची सूचना संस्था कार्यकर्ता ॲड. अक्षय पाठक यांनी केली.
यावेळी पालिका शाळांमधील सुविधा विषयांवर स्वयंसेवकांनी महापौरांसोबत सविस्तर चर्चा केली. महापौर हर्षाली चौधरी यांनी सर्वेक्षणातील निष्कर्षांची गांभीर्याने दखल घेत संबंधित महानगरपालिका विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत तातडीने निर्देश देण्याचे आश्वासन दिले. शाळांजवळील वाहतूक सुरक्षितता, पाण्याच्या टाक्यांची पाहणी व स्वच्छता आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेत सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन ॲड. हर्षाली चौधरी यांनी दिले. या सर्व मागण्यांबाबत महानगरपालिका आयुक्त कार्यालयाकडेही स्वतंत्र निवेदन कार्यकर्त्यांनी दिले. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती ॲड. आकाश वेदक यांनी दिली.
महापौरांसोबत भेटीच्यावेळी युथ फॉर एज्युकेशन तर्फे शुभम शिंदे, ओंकार जाधव, गायत्री गावंडे, मिली साहो, विपुल इंगोले, प्रज्वल वरडकर आणि सिद्धेश बाविसकर उपस्थित होते. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी युथ फॉर एज्युकेशन सातत्याने सकारात्मक व रचनात्मक पद्धतीने कार्यरत राहणार आहे, असे युथ फॉर एज्युकेशनच्या पूजा मीठ भावकार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिक्षणाची गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता, असे त्यांनी बैठकीत सांगितले.
