कल्याण : कल्याण लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेचा अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त आहे, असा विचार करून भूमाफियांनी कल्याण पूर्वेतील व्दारली, नांदिवली तर्फ भागात रस्ते, मोकळ्या जागा अडवून तेथे बेकायदा गोदामे, बेकायदा चाळी उभारल्या होत्या. याविषयी तक्रारी प्राप्त होताच, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी नऊ गोदामे, याच भागातील बेकायदा चाळी जेसीबी यंत्र आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने शुक्रवारी भुईसपाट केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ, व्दारली गाव हद्दीत भूमाफियांनी गाव हद्दीतील मोकळ्या जागा हडप करून तेथे गोदामांची आणि बेकायदा चाळींची बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांना तातडीने रंगरंगोटी करून या गोदामांचा वापर, खोल्यांमध्ये रहिवास सुरू करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या होत्या. याविषयीची कुणकुण लागताच आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी निवडणूक कामातून वेळ काढून नांदिवली तर्फ, व्दारली येथील गोदामे, बेकायदा चाळी तोडकाम पथक, जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी जमीनदोस्त केल्या. यावेळी गुन्हा दाखल होईल या भीतीने भूमाफियाने पळून गेले होते.

हेही वाचा…ठाण्यात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून एकाला मारहाण, चितळसर पोलीस ठाण्यात नोंद

दहा प्रभागांमध्ये आय प्रभागात सर्वाधिक बेकायदा बांधकामांविरुध्द कारवाई सुरू असल्याने माफियांचे कंबरडे मोडले आहे. या सततच्या कारवाईने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या आक्रमक कारवाईचे कौतुक केले आहे.

बांधकामे जैसे थे

पालिकेच्या डोंबिवली विभागातील ह आणि फ प्रभागात बेफाम बेकायदा बांधकामे सुरू आहेत. परंतु, या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आम्ही लोकसभा निवडणूक कामात खूप व्यस्त असे तक्रारदारांना सांगून या बेकायदा बांधकामांना अभय देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ह प्रभागात कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांच्या बेकायदा कोंबड्याच्या खुराड्यावर कारवाई न केल्याने या खुराड्यात कोंबड्या, त्यांची पिल्ले आणून व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा…अंबरनाथमधील अतिरिक्त एमआयडीसी रस्ते भागात दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण

ठाकुरवाडीतील भूमाफिया प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्स, गटारवरील दोन बेकायदा इमारती, जुनी डोंबिवलीतील धिरेंद्र भोईर यांनी तक्रार केलेली शिवलिला, राहुलनगर मधील सुदामा, रमाकांत आर्केड इमारती, कुंभारखाणपाडा हरितपट्टयावरील बेकायदा बांधकामे सुरू आहेत.

फ प्रभागात खंबाळपाडा, सुयोग हॉल गल्लीतील आराधना पुनर्निमाणाच्या इमारतीचे बेकायदा बांधकाम वेगाने पूर्ण करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या आहेत. आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना निवडणूक कामातून बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी वेळ मिळतो, मग फ आणि ह प्रभागातील अधिकारी बेकायदा बांधकामांविषयी उदासिन का, असे प्रश्न तक्रारदार करत आहेत.

हेही वाचा…कल्याणमधील ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांना मानपाडा पोलिसांची नोटीस

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आय प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. जुन्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी प्राप्त होत्याच ती बांधकामेही विहित प्रक्रिया पूर्ण करून तोडली जात आहेत. आय प्रभागात नवीन बेकायदा बांधकाम सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच तातडीने ती बांधकामे तोडली जातात. – हेमा मुंबरकर,साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipality action on land mafias in kalyan illegal constructions demolished psg