कल्याण – शाळा सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी असल्याने कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसर, मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये वह्या विक्री करणाऱ्या मंचांचे मांडव उभारणीस सुरूवात झाली आहे. मोक्याची जागा आपणास मिळावी म्हणून अनेक वह्या विक्री करणाऱ्या मंडळींनी कल्याण डोंबिवली पालिका, वाहतूक विभागाच्या परवानग्या न घेता घाईघाईने रात्रीच्या वेळेत मांडव उभारणीची कामे सुरू केली आहेत. या सर्व वह्या विक्रेत्यांना बड्या राजकीय मंडळींचा आशीर्वाद असल्याने ही मंडळी धाडसाने वाहतूक कोंडीचा विचार न करता वर्षानुवर्ष रस्ते अडवून वह्या विक्री करत आहेत.

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील रस्ते, मुख्य वर्दळीचे रस्ते, शाळांच्या परिसरात ही वह्या विक्री केली जाते. शाळा सुरू होण्यास आता दहा दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे पालकांकडून आता मुलांसाठी वह्या खरेदीची लगबग सुरू होईल. दुकानातून महागड्या वह्या खरेदीपेक्षा रस्त्यावरील मांडवातील वह्या विक्री केंद्रातून वह्या खरेदी केल्या की त्या खरेदीत सूट मिळते. आणि सवलतीत वह्या या मिळत असल्याने पालकांची या वह्या विक्री केंद्रांकडे सर्वाधिक धाव असते.

राजकीय आशीर्वाद

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील वर्दळीचे रस्ते, चौक भागात आता रात्रीच्या वेळेत हे मंडप उभारणीस सुरूवात झाली आहे. मांडव उभारणीस वेळ लावला तर ती जागा अन्य कोणी बळकावण्याची भीती विक्रेत्यांना असते. त्यामुळे पादचारी, वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने आपण मंडप उभारणी करत आहोत याचे भान न ठेवता विक्रेते मंडप उभारणी करून त्या मंडपात तातडीने वह्यांचे गठ्ठे आणून टाकत आहेत. अनेक विक्रेते वह्यांवर आपल्या नेत्यांचे फोटो लावून वह्या विक्री करतात. पालिका अधिकारी, वाहतूक अधिकारी या विक्री केंद्रावर कारवाईसाठी आले तर तात्काळ राजकीय मंडळींना फोन लावून ही विक्रेते मंडळी कारवाईत अडथळा आणतात. जून ते ऑगस्टपर्यंत हे वह्या विक्रेते रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करतात.

रस्ते अडवून हे मंच उभारण्यात येत असल्याने या भागातून जाणाऱ्या शालेय बस, इतर वाहनांना अडथळा होतो. त्यामुळे ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची सर्वाधिक दमछाक होते. हे मंच बाजुला करण्यास सांगितले तर राजकीय मंडळींचा फोन येतो. त्यामुळे अशा दुहेरी कोंडी पालिका अधिकारी, वाहतूक पोलीस अडकलेले असतात. या वह्या विक्री केंद्राच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते आपली प्रसिध्द लोकांमध्ये करून घेतात. काही जण आपल्या प्रतिमा असलेल्या वह्या या केंद्रात विक्रीसाठी ठेवतात. त्या सह्या अधिक सवलतीत विक्री केल्या जातात. घराघरात आपली प्रतिमा आणि पक्षाचे नाव जावे हा या मागील उद्देश असतो.