कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत नालेसफाईची कामे ठेकेदारांनी सुरू केली आहेत. ही कामे ठेकेदारांनी पाऊस सुरू होण्यापूर्वी ३१ मेच्या आत पूर्ण करावी. पाऊस सुरू होईल, मग आपण टंगमंगळ करून नालेसफाईची कामे करू, असा विचार करून कोणीही नालेसफाईचा ठेकेदार काम करणार असेल तर त्या ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी दिला.

महापौर ॲड. चौधरी यांनी बुधवारी कल्याणमधील अ प्रभाग हद्दीतील नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांना नाले गाळाने भरले आणि नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. या दौऱ्याच्यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी उपस्थित होत्या. काही ठेकेदार पाऊस सुरू होण्याची वाट पाहत नालेसफाईची कामे उशिरा सुरू करतात. आणि पाऊस सुरू झाला की सफाईची कामे अर्धवट सोडून केलेल्या अर्धवट कामाचे पूर्ण देयक काढतात, असे यापूर्वी निदर्शनास आले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी असे कोणतेही प्रकार करू नयेत, असे महापौरांनी सांगितले.

आपण कल्याण, डोंबिवली शहरातील सर्व लहान, मोठ्या नाल्यांची पाहणी करणार आहोत. या नालेसफाईत ठेकेदारांनी हलगर्जीपणा करून नालेसफाईची कामे केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. विहित वेळेत ही नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात आली आहेत.

महासभेत टीका

मार्चमधील महासभेत अनेक नगरसेवकांनी काही ठेकेदार कमी दर टाकून नालेसफाईची कामे घेतात. हे ठेकेदार अतिशय निकष्ट पध्दतीने नालेसफाईची कामे करतात. त्यांच्याकडे सफाईची यंत्रणा नसते. अर्धवट स्थितीत नालेसफाईची कामे करून पूर्ण काम केल्याचे देयक काढतात. या ठेकेदारांनी नालेसफाईची कामे व्यवस्थित केली आहेत की नाही याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांकडून घ्यावी. नगरसेवकांनी ठेकेदाराने नालेसफाईचे काम व्यवस्थित केले आहे याची खात्रीलायक माहिती दिल्यावर त्या ठेकेदाराचे देयक अदा करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

मागील ३० वर्षात ठराविक ठेकेदार नालेसफाईची कामे घेतात. हे ठेकेदार पाऊस सुरू होण्याचा अंदाज घेऊन नालेसफाईची कामे हाती घेतात. आणि पाऊस सुरू झाला की आपल्या कामाकडे कोणाचे लक्ष नाही, असे समजून ती कामे अर्धवट सोडून देतात. केलेल्या कामाचे मात्र पूर्ण देयक पालिकेतून काढतात, अशीही माहिती नगरसेवकांनी महासभेत दिली.

आयुक्तांचा इशारा

नालेसफाईची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर पालिकेची बारकाईने पाळत राहील. गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांवर जीपीएस सिस्टिम बसून घेण्यात येईल. त्यामुळे त्या ठेकेदाराने दिवसभरात किती गाळ उपसा. तो कोणत्या ठिकाणी किती फेऱ्यांमध्ये नेऊन टाकला. हे मोजणे शक्य होणार आहे. नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर एकाही ठेकेदाराचे देयक काढले जाणार नाही. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी ठेकेदारांवर बारकाईने पाळत ठेऊन त्यांच्याकडून काम करून घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेला दिले आहे.

शहर अभियंता अनिता परदेशी यांनीही नालेसफाईची कामे सुरू असताना नियंत्रक अभियंते दैनंदिन या ठेकेदारांच्या कामावर लक्ष ठेवणार आहोत. आपणही प्रभागप्रमाणे अचानक दौरा करून या नालेसफाईंच्या कामांची पाहणी करणार आहोत, असे सांगितले.