डोंबिवली: कल्याण, डोंबिवली शहरातील खड्ड्यांनी भरलेले रस्ते. खड्डे पडलेल्या रस्त्यांवर काही ठिकाणी काँक्रीटची भरणी, तर काही ठिकाणी माती खडीचा वापर, काही ठिकाणी फरसबंदीचे (पेव्हर ब्लाॅक) रस्ते शहरात कसे असू शकतात, असे सवाल करीत शहरातील खड्ड्यांवरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी गुरूवारी कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी भाजप-शिंदे शिवसेना, या शहरांचे आमदार, खासदार यांना लक्ष्य केले.

विद्रुप दिसणारे रस्ते व न भरल्या गेलेल्या खड्ड्यांवरून या शहरातील नागरिकांनी येथील आमदार, खासदार यांना प्रश्न विचारला पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा याठिकाणी खासदार आहे. वर्षानुवर्ष तेच खड्डे, तेच रस्ते, त्यामुळे ही ऐतिहासिक, सांस्कृतिक शहरे घाण होत चालली आहेत, अशी खंत अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.

यापूर्वी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली शहराचा उल्लेख घाणेरडा, गलिच्छ असा केला होता. आता तीच री अमित ठाकरे यांनी ओढली. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या नोंदणी अभियानासाठी अमित ठाकरे गुरुवारी कल्याण, डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, प्रगती महाविद्यालय, कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या महाविद्यालयांमध्ये मनसेच्या विद्यार्थी सेना युनिटची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील, मनसे विद्यार्थी सेना राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष धनंजर गुरव, जिल्हाध्यक्ष हर्षद पाटील, शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे उपस्थित होते.

डोंबिवलीत येताना या शहरातील रस्ते सुस्थितीत असतील असे वाटले होते. पण शहरात प्रवेश केल्यावर जागोजागी पडलेले खड्डे, त्या खड्ड्यांवर काही ठिकाणची फरसबंदी, तर काही ठिकाणी माती खडी, तर काही ठिकाणी काँक्रीटचे मिश्रण टाकलेले. हे अशाप्रकारचे खड्डे व त्यातील भरणी पाहून, असे कसे रस्ते असू शकतात असा प्रश्न मला पडला, असे ठाकरे म्हणाले.

अशा या नियमितच्या समस्यांमुळे ही चांगले शहरे पण दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत. नागरिकांनी या शहराच्या लोकप्रतिनिधींना यासंदर्भात प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांच्याकडून कामे करून घेतली पाहिजेत. रस्त्यांवरील खड्डे हे केवळ ‘झेन की अल्फा झेन’चा प्रश्न नाही. हे सर्व प्रश्न सामान्य नागरिकांपासून ते सर्व स्तरातील नागरिकांशी निगडित आहेत. प्रवाशांनी खच्चून भरून उपनगरी रेल्वेगाड्या धावतात. रेल्वेगाड्यांना दरवाजे नसल्याने दररोज आठ प्रवाशांचा बळी जात आहे. या सर्व विचित्र स्थितीवर सरकारलाच जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही ते या वेळी म्हणाले.