कल्याण – मागील वर्षभरापासून पडघा-पाल उच्च वीज वाहिनीत होत असलेले नियमितचे तांत्रिक बिघाड, त्यामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, २७ गाव परिसराचा तासन तास खंडित होणारा वीज पुरवठा, या नियमितच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे उद्योग, व्यवसाय, नागरिकांना त्रास होत असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (महापारेषण) कंपनीने भिवंडी तालुक्यातील पडघा-पाल २२० किलोवॅट उच्च वीज वाहिनीच्या क्षमता वाढीचे काम २६ जुलैपासून सुरू केले आहे. हे काम २५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे, असे महापारेषण कंपनीने कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण)च्या डोंबिवली अतिउच्च दाब (ईएचव्ही) संचालन व देखभाल विभागामार्फत २२० केव्ही पडघा–पाल वीजवाहिनीच्या क्षमतावाढीचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या कालावधीत कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, तसेच डोंबिवली शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेद्वारे सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कामाच्या दरम्यान संबंधित परिसराचा वीजपुरवठा २२० किलोवॅट पडघा–जांभूळ या एकाच वीज वाहिनीद्वारे करण्यात येणार आहे, असे महापारेषणने म्हटले आहे. या कामाच्यावेळी महापारेषणचे वरिष्ठ अभियंते रात्रंदिवस या कामाच्या ठिकाणी कामाच्या मजबुतीकरण आणि अचूकतेसाठी तळ ठोकून आहेत. सुमारे १०० हून अधिक मजूर यासाठी कार्यरत आहेत.
या वीज वाहिनी क्षमता वाढीच्या कामाच्या कालावधीत पर्यायी वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यास काही भागात तात्पुरता वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. अथवा आवश्यकतेनुसार चक्रीय पद्धतीने (लोडशेडिंग) वीजपुरवठा नियंत्रित करण्याची वेळ येऊ शकते. असा वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापारेषणने केले आहे.
या क्षमता वाढीच्या कामामुळे भविष्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली २७ गाव, पलावा, शिळफाटा रस्ता परिसरातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह, सक्षम आणि अखंड ठेवण्यास मदत होणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या वर्षभरात पडघा पाल उच्च दाब वीज वाहिनीत पाच ते सहा वेळा मोठे तांत्रिक बिघाड झाले होते. यामुळे या वीज वाहिनीवरून होणारा कल्याण, डोंबिवली परिसराचा वीज पुरवठा सात ते आठ तास खंडित होत होता. वादळ, पाऊस नसताना अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त होते.
