डोंबिवली – लडाखमधील शून्यापेक्षा कमी तापमान, विरळ प्राणवायू आणि अतिशय आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती, वातावरणावर मात करत पार पडलेल्या मानाच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ”रनर्स क्लॅन फाऊंडेशन” च्या कल्याण, डोंबिवली भागातील धावपटूंनी यशस्वी मार्गक्रमण केले. कल्याण-डोंबिवली शहरांच्या क्रीडा विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच रनर्स क्लब फाऊंडेशनच्या खेळाडूंनी लडाखच्या भूमीवर हा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. ५८ वर्षाचे विजय सकपाळ, दिगेंदर महारा (३५), गोपीनाथ नायर (६५), वैशाली सकपाळ लडाखमधील खरदुंगला शिखर चढाईची यशस्वी मोहीम पार पाडली आहे. रनर्स क्लॅन फाऊंडेशनच्या धावपटुंच्या या यशस्वी चढाईबद्दल डोंबिवली, कल्याण शहर परिसरात त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

५८ व्या वर्षी ७२ किमीचे अंतर पार

जगातील सर्वाधिक उंचीवरील आणि अत्यंत खडतर मानली जाणारी ”७२ किमी खरदुंगला चॅलेंज” ही एक हजार ६१५ किलोमीटर उंच चढाईची शर्यत रनर्स क्लॅन फाऊंडेशनचे ५८ वर्षीय धावपटू विजय सकपाळ यांनी खडतर हवामानावर, कडकाच्या थंडीत १२ तास ३६ मिनिटे २८ सेकंदांत यशस्वीपणे पूर्ण केली. कल्याण-डोंबिवली शहर परिसरातून हे कठीण आव्हान पहिल्यांदाच पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे. ६५ वर्षीय गोपीनाथ नायर व दिगेंदर महारा यांनीही या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. तसेच, इतर दोन धावपटूंनी ४२.१९५ किलोमीटरची ”फुल मॅरेथॉन” यशस्वीरीत्या पूर्ण केली.

दिगेंदर महारा .यांनी ४२.१९५ किलोमीटरची ११ हजार १५५ फूट उंचीच शर्यत ४ तास २७ मिनिटांत पूर्ण केली. गोपीनाथ नायर यांनी आपल्या वयोमानावर मात करत ४२.१९५ किलोमीटरची शर्यत ६ तास ३२ मिनिटांत पूर्ण करून शरीर सुदृढतेचा नवा आदर्श निर्माण केला. या स्पर्धेत वैशाली विजय सकपाळ या पारंपरिक नऊवारी साडीत या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. लडाखच्या या खडतर आव्हानातील शर्यतीत हिंदु संस्कृतीमधील पारंपारिक वेशात एक महिला सहभागी झाल्याने ते स्पर्धेचे एक वेगळे आकर्षण ठरले.

वैशाली विजय सकपाळ यांनी ५ किलोमीटरची धाव शर्यत पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून पूर्ण केली. लडाखच्या भूमीवर मराठी संस्कृती जपणाऱ्या वैशाली यांच्या या सहभागाने उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेच्या आयोजकांनी वैशाली यांना व्यासपीठावर विशेष आमंत्रित करून सन्मानित केले. मागील अनेक महिने रनर्स क्लॅनचे सदस्य या स्पर्धेसाठी सराव करत होते. ‘योग्य सराव, जिद्द आणि सातत्य असेल तर वयाची कोणतीही अट आडवी येत नाही,’ असा प्रेरणादायी संदेश या धावपटूंनी या खडतर आव्हानातील स्पर्धेतून दिला आहे.