कल्याण : मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रेने केलेल्या डाॅक्टर मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या गुन्ह्यातील सर्व बारकावे शोधून काढण्याचे काम पोलिसांची तपास यंत्रणा करत आहे. पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ज्या डाॅक्टर दालनात रमेश म्हात्रेने डाॅक्टरांना मारहाण केली. त्या दालनातील सीसीटीव्ही चित्रणातील म्हात्रेसह डाॅक्टर, परिचारिकांच्या आवाजाचे ध्वनी आणि प्रतिमांचे निश्चितीकरण बुधवारी फोरेन्सिक पथकाने कल्याणमध्ये येऊन केले.
कल्याणमधील साहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्त कार्यालयात सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यंत फोरेन्सिक विभागाचे तांत्रिक पथक पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे आणि त्याचे सहकारी रुग्णालयात आल्यापासून ते डाॅक्टरांना मारहाण केल्यानंतर बाहेर पडेपर्यंतच्या सीसीटीव्ही चित्रणातील रमेश म्हात्रेचा ध्वनी, त्याच्या मारहाणीच्या हालचाली, मारहाण केल्यानंतर रुग्णालयात आणि डाॅक्टरांना मारहाण होत असलेल्या दालनातील वास्तवदर्शी परिस्थितीचे सीसीटीव्हीने टिपलेल्या प्रतिमांचे विश्लेषण आणि निश्चितीकरण करत होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशावरून रमेश म्हात्रे डाॅक्टर मारहाण प्रकरणाचा तपास स्थानिक विष्णुनगर पोलीस ठाण्याकडे न ठेवता तो आता थेट पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडून करण्यात येत आहे. उपायुक्त झेंडे यांची कर्तव्य कठोरता, घडल्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून झेंडे यांनी सहकाऱ्यांच्या साहाय्याने अतिशय बारकाईने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याच्या तपासाला आता गती आली आहे.
ठेकेदारांचीही चौकशी शास्त्रीनगर रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणाऱ्या ठेकेदार एजन्सीच्या चालकांची फौरेन्सिक आणि तपास पथकांनी चौकशी केली. रुग्णालयात सीसीटीव्ही बसविल्यापासून ते त्याची देखभाल, दुरुस्तीविषयक, यापूर्वी कधी सीसीटीव्ही यंत्रणेची विदा उडाली होती. हार्डडिस्कमधील तांत्रिक बाबी असे अनेक प्रश्न फोरेन्सिक विभागाच्या तपास पथकांनी ठेकेदार एजन्सीला उपस्थित केले. त्याची समग्र उत्तरे एजन्सीकडून देण्यात आल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले.
ठेकेदाराने दिलेल्या माहितीनंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण, तेथील हार्डडिस्क आणि इतर तांत्रिक बाबी संकलित, त्या सिलबंद करून तपास यंत्रणेने त्या तपास अधिकारी, उपस्थित पंच यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आपल्या ताब्यात घेऊन अधिक विश्लेषणासाठी सोबत नेल्या.
शास्त्रीनगर रुग्णालयात डाॅक्टरांना मारहाण करणारा इसम हा रमेश सुकऱ्या म्हात्रेच होता. सीसीटीव्ही चित्रणात येणारा शिवीगाळ करताना, बोलतानाचा आवाज हा त्याचाच होता. त्यामध्ये कोणतेही तांत्रिक फेरबदल नव्हते. याची खातरजमा आणि निश्चितीकरण फोरेन्सिक विभागाच्या पथकाने केली असल्याचे एका वरिष्ठ पोलीस सुत्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
याप्रकरणाचा अतिशय गांभीयाने तपास सुरू आहे. उच्च न्यायालयाची याप्रकरणावर बारकाईने नजर आहे. त्यामुळे याप्रकरणातील अधिक माहिती उघड करणे योग्य नाही, असे सुत्राने सांगितले. म्हात्रे प्रकरणात अधिकाधिक पुरावे जमा करून त्याच्या विरूध्दचा खटला अधिकाधिक भक्कम करण्याचा तपास यंत्रणेचे प्रयत्न आहेत.
फोटो ओळ फोरेन्सिक वाहन.
