कल्याण: शासकीय, महापालिका रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका समर्पित भावाने रुग्ण सेवात देत असतात. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी या रुग्णालयांमध्ये येऊन आपल्या मनाप्रमाणे रुग्णाला रुग्णसेवा मिळाली नाहीतर थेट डाॅक्टर, परिचारिकांना मारहाण करत आहेत. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका मारहाण प्रकरण अशाच प्रकारातून घडल आहे. असे प्रकार वाढत असल्याने आणि या सर्व प्रकरणात शासनाची बदनामी होत असल्याने डोंबिवलीतील शास्त्रीनगर डाॅक्टर मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासनाने नगरसेवक रमेश म्हात्रे आणि समर्थकांवर कठोर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य सचिव अजय क्षीरसागर यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे केली आहे.
या डाॅक्टर मारहाण प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यातील सरकारी रुग्णालयातील सर्व डाॅक्टर, परिचारिकांनी काळ्या फिती लावून काम केले आणि घडल्या घटनेचा निषेध केला. रुग्णालयातील प्रत्येक डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी विविध प्रकारचे कौटुंबिक, कामाचा ताण घेऊन सर्मपित भावाने रुग्ण सेवा देत असतो. या कामात काही त्रृटी, चुकी झाली तर स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवकाने त्या चुकी निदर्शनास आणून त्यात दरुस्ती करण्याची सूचना करावी. त्याची दखल घेतली जाते.
पण, अलीकडे रुग्णालयातील उपलब्ध साधने, मनुष्यबळ यांचा कोणताही विचार न करता नगरसेवकांना आपल्या मनाजोगी आपल्या नात्यामधील, मतदात्या रुग्णाला योग्यरितीने रुग्णालयात रुग्ण सेवा मिळाली नाही की कोणत्याही गोष्टींचा विचार न करता ही मंडळी थेट डाॅक्टर,उपस्थित कर्मचारी, परिचारिकांवर जीवघेणा हल्ला करतात.
प्राप्त परिस्थितीत अशावेळी कोणीही तेथे बचावासाठी नसल्याने उपस्थित डाॅक्टर, परिचारिकांना त्या हल्ले, तोडफोड, मारहाणीच्या घटनांना सामोरे जावे लागते. शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डाॅक्टर, परिचारिका, पुरूष डाॅक्टर यांना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केलेली मारहाण अतिशय निंदनिय आहे. अशा नगरसेवक, त्यांच्या समर्थकांवर शासनाकडूनही वेळीच कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
अनेक वेळा अशा मारहाणीच्या घटना घडत असताना या लोकप्रतिनिधींचे समर्थक मोबाईलमधून चित्रीकरण करून ते समाज माध्यमांत सामाईक करतात. वैद्यकीय कायद्याने असे प्रकार शिक्षेच्या चौकटीत आहेत. त्यामुळे या कायद्यांची ओळख करून देण्यासाठी त्याचा वेळच्या वेळी अवलंब होणे आवश्यक आहे, असे राज्य सचिव क्षीरसागर यांनी उपसंचालकांच्या निदर्शनास आणले आहे.
पालिका, शासन रुग्णालयांमधील डाॅक्टरांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कास्ट्राईब संघटनेने आरोग्य विभागाला दिला आहे.
