ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा सेंट्रल मार्ड संघटनेने (महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना) यांनी तीव्र निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयांमध्ये गुरुवारी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेने केली आहे. तसेच, बुधवारपासून ७२ तासांत रमेश म्हात्रे यांना अटक करुन कायदेशीर कठोर कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष डाॅ. अथर्व शिंदे यांनी दिला.

शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिकांना सोमवारी शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या घटनेचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. त्यानंतर आता निवासी डाॅक्टरांच्या सेंट्रल मार्ड या संघटनेने देखील इशारा दिला आहे.

सेंट्रल मार्डने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचा सेंट्रल मार्ड, महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेतर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य असून ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारपासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि शासकीय रुग्णालयांमध्ये राज्यव्यापी काळ्या फितीचे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डाॅ. अथर्व शिंदे यांनी सांगितले.

या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी तसेच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी सेंट्रल मार्डने संबंधित यंत्रणांना ७२ तासांची मुदत दिली आहे. या ७२ तासांच्या कालावधीत आरोपींना अटक करण्यात अपयश आल्यास, बेमुदत आंदोलन केले जाणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही सर्वसामान्य नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे शासनाने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी आणि कठोर उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी सेंट्रल मार्डची मागणी आहे.