कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला, पुरूष डाॅक्टर, परिचारिका यांना सोमवारी संध्याकाळी बेदम मारहाण करणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय परिसरातील शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द करा, अशी जोरदार मागणी आता कल्याण, डोंबिवली शहरातील विविध स्तरातील नागरिक, डाॅक्टर, वकील, जाणत्यांकडून करण्यात येत आहे.
या नगरसेवकावर यापूर्वी मारहाण, दांडगाई, हाणामारी, दंगल घडविणे, खुनाच्या आरोप असलेले अनेक गुन्हे स्थानिक पोलीस, डायघर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. गुन्हेगार पार्श्वभूमीचा हा नगरसेवक अलीकडे आपल्या प्रभागातील बेकायदा इमारती, बेकायदा चाळींमुळे खूप अडचणीत आला आहे. या नगरसेवकाच्या मुलावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात बेकायदा इमारत उभारणी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदे शिवसेनेच्या या दांडगाईखोर नगरसेवकावरील स्थानिक पोलीस ठाण्यातील गुन्हे, त्याच्यावर न्यायालयात सुरू असलेले खटले याचा विचार करून या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी आता शासन, राज्य निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी शहरातील विविध क्षेत्रातील जाणत्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिंदे शिवसेना, भाजप आणि इतर पक्षातील काही नगरसेवक खासगीत या नगरसेवकाच्या दांडगाई विषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
आयोगाकडे तक्रार
शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे शिवसेनेच्या या नगरसेवकाने केलेल्या मारहाणीचा संदर्भ, या नगरसेवकावर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे हा सर्व संदर्भ घेऊन काही ज्येष्ठ वकील या उन्मत्त दांडगाईखोर नगरसेवकाच्या विरूध्द राज्य निवडणूक आयोग, राज्याचा गृहविभाग, केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे तक्रारी करून या नगरसेवकाचे नगरसेवक पद तातडीने रद्द करा, अशी मागणी करणार आहेत. काही जागरूक नागरिक या नगरसेवकाच्या दांडगाई संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे, अशी माहिती काही जागरूक नागरिकांनी दिली.
दांडगाईविरूध्द संताप
शिंदे शिवसेनेच्या डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर भागातील या नगरसेवकाच्या दांडगाईपणा विरूध्द शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या नगरसेवकाने यापूर्वी शिळ डायखऱ् भागातील मोकाशी पाडा भागात रात्रीच्या वेळेत २५ ते ३० जण जमीन विषयक प्रकरणातून गावात दंगा केला होता. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दांडगाईच्या जोरावर या नगरसेवकाच्या प्रभागात खाडी किनारा भागात बेसुमार बेकायदा चाळींची कामे कांदळवन नष्ट करून सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. याविषयी एक जागरूक नागरिक कल्पेश जोशी, विनोद जोशी पालिका, शासनाकडे तक्रारी करून या बेकायदा चाळीवर कारवाई करण्यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्नशील आहेत.
या शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकाविरूध्द कोणीही बातमी लिहिली की त्या पत्रकाराला मोबाईलवर, प्रत्यक्ष भेटल्यावर दादागिरी करणे असा या नगरसेवकाचा इतिहास आहे. काही वर्षापूर्वी पालिकेच्या महासभेत या नगरसेवकाने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक उपमहापौर राहुल दामले यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. रस्ते जमिनीच्या विषयावर या नगरसेवकावरून एकदा महासभेत प्रचंड राडा झाला होता.
या नगरसेवकाची दांडगाई वाढत असल्याने आणि या नगरसेवकाचे वरिष्ठ वेळोवेळी त्याची पाठराखण करत असल्याने शासनाने, राज्य निवडून आयोगाने या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी जाणत्या नागरिकांकडून करण्यात येणार आहे.
