कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला, पुरूष डॉक्टर आणि दोन परिचारिकांना एक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांकडून झालेल्या मारहाण, धक्काबुक्की प्रकरणाची कल्याण डोंबिवलीतील इंडियन मेडीकल असोसिएशनच्या डाॅक्टर पदाधिकारी, सदस्यांनी तीव्र शब्दांत निर्भत्सना केली आहे. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मारहाण करणाऱ्या संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा, कल्याण डोंबिवलीतील सर्व खासगी डॉक्टर बंद पुकारतील, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.
या मारहाण प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत आपली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या इसमांवर वेळीच कारवाई केली नाहीतर त्यांची अशा गुन्हेगारी घटना करण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे याप्रकरणी पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाजुने उभे राहावे आणि सबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली.
गरोदर महिलेच्या उपचारावरून पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅ. सृष्टी बाविस्कर, डाॅ. विशाल साळुंखे यांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी संध्याकाळी ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये परिचारिकांना धक्काबुक्की झाली. डाॅ. बाविस्कर यांचा मोबाईल रमेश म्हात्रे यांनी हाताने खाली पाडून त्यांना त्यामधील चित्रण काढुन टाकण्यासाठी दबाव टाकला.
या सर्व प्रकरणाचे राज्यभरातील डाॅक्टरांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्राही डाॅक्टर, कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. डाॅक्टर, परिचारिकांच्या मारहाणीचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण आणि डोंबिवली शाखांनीही निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
‘आयएमए’ कल्याण – डोंबिवलीनेही शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. बुधवारपर्यंत डॉक्टर, परिचारिकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास कल्याण डोंबिवलीतील आयएमएशी संलग्न सर्व खासगी डॉक्टर आपापल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवतील, असा इशारा आयएमएचे अध्यक्ष डाॅ. राजेश राघव राजू यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
आयुक्त गोयल यांना भेटलेल्या शिष्टमंडळात ‘आयएमए’चे कल्याणचे अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू, डोंबिवली अध्यक्षा डॉ. कामत, कल्याण आयएमएचे सचिव डॉ. हिमांशु ठक्कर, खजिनदार डॉ. स्वाती शेलार, माजी अध्यक्ष आणि पालिकेचे सदिच्छादूत डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह डॉ. राहुल तिवारी, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. मनोज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
