कल्याण – आपणास गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत सतत कळवुनही आपण उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोणत्याही पत्राला समाधानकारक उत्तर, स्पष्टीकरण देत नाहीत. आपण ठाकरे गटातून आणि या पक्षाच्या मशाला चिन्हावर निवडून आला आहात. तरीही आपण कोकण विभागीय आयुक्तांकडील गट नोंदणीसाठी सहकार्य केले नाही. हे सर्व पक्ष शिस्तीला धरून नाही.

त्यामुळे आपण तातडीने आपले पक्षातील सहभागाचे स्पष्टीकरण तातडीने द्यावे, अन्यथा कोकण विभागीय आयुक्तांतर्फे आपल्या विरूध्द नगरसेवक अपात्रतेची कार्यवाही सुरू केली जाईल, असा इशारा देणारी अंतीम नोटीस ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी तीन बंडखोर नगरसेवकांना बजावली आहे.

कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे, पश्चिमेतील स्वप्नाली केणे आणि राहुल कोट यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेत ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले आहेत. केणे, म्हात्रे आणि कोट या नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर ठाकरे गटात सहभागी होण्याऐवजी त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या छावणीत जाणे पसंत केल्याची चर्चा आहे. या तिन्ही नगरसेवकांची नगरसेवक विजयाची प्रमाणपत्रे शिवसेना शिंदे गटाच्या एका वजनदार नेत्याच्या तिजोरीत असल्याची चर्चा आहे. हे तिन्ही फुटीर नगरसेवक कसे शिंदे शिवसेनेचे नगरसेवक आहे हे दाखविण्याचा प्रयत्न पालिकेत शिवसेना शिंदे गटातून केला जात आहे.

पालिकेत तिढा

ठाकरे गटाचे हे तीन नगरसेवक सभागृहात नक्की कोणाच्या बाजुने बसणार. ते ठाकरे गट सोडून शिंदे शिवसेनेच्या बाजुने बसले तर त्यांच्यावर ठाकरे गटातून अपात्रतेची कारवाई सुरू केली जाणार आहे. या सर्व त्रांगड्यामध्ये निवडणूक होऊन दोन महिने उलटले तरी पालिकेची महासभा होऊ शकली नाही. स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती सभापतीच्या निवडी यामुळे रखडल्या आहेत. या सर्व प्रकाराने सत्ताधारी शिवसेना, भाजपमधील नगरसेवक त्रस्त आहेत.

अंतीम नोटिसा

ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून येऊन आपण कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीसाठी सहकार्य केले नाही. पक्षाच्या कोणत्याही नोटीस, पत्राला उत्तर दिले नाही. त्यामुळे आपल्या पक्षातील सहभागाविषयी संशय आहे. आपले वर्तन हे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था अपात्रता अधिनियम १९८६ च्या कलम ३ (१) (अ) अन्वये स्वच्छेने पक्ष सदस्यत्वाचा त्याग केल्याचे मानले जाऊ शकते. त्यामुळे तात्काळ ठाकरे गटाच्या अधिकृत गटात सहभागी व्हावे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर ४८ तासाच्या आत आपली पक्षनिष्ठा स्पष्ट करावी. पक्षाच्या सर्व आदेशाचे पालन करू, अशी हमी द्यावी, असे ठाकरे गटाने या तीन नगरसेवकांना अंतीम नोटिसीच्या माध्यमातून कळविले आहे.

आपण दिलेल्या कालावधीत आपले स्पष्टीकरण पक्षाकडे दाखल केले नाहीतर आपणा विरूध्द महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाच्या कलम सात अन्वये कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या अपात्रतेसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू केली जाईल. ही आपण स्पष्टीकरण देण्याची अंतीम संधी आहे, असे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी या तीन नगरसेवकांना कळविले आहे.