कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील पालिकेच्या स्मशानभूमींना अमेरिका-इस्त्रायल विरूध्द इराण युध्दाच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. युध्दामुळे स्मशानभूमीतील गॅस शव दाहिन्यांना व्यापारी गॅस सिलिंडरचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही. या स्मशानभूमींमधील गॅस शवदाहिन्या मागील दीड महिन्यांपासून व्यापारी गॅस सिलिंडर अभावी बंद आहेत. नागरिकांकडून पार्थिव गॅस शवदाहिनीत दहन करण्याची मागणी स्माशानभूमी चालकाकडे करत आहेत. परंतु, गॅस सिलिंडरमुळे दाहिनी बंद असल्याने नागरिकांना लाकडाचा वापर करून पार्थिव दहन करावे लागत आहे.

युध्दबंदी होऊन अनेक दिवस लोटले आहेत. सर्वदूर गॅस सिलिंडरचा मुबलक पुरवठा होत आहे. मग कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मशानभूमीला गॅस सिलिंडरचा मुबलक पुरवठा का होत नाही, असे प्रश्न नागरिक करत आहेत. पार्थिव स्मशानभूमीत घेऊन आलेले अनेक नागरिक पार्थिव गॅस शवदाहिनीत दहन करण्याची मागणी करतात. परंतु, गॅस दहिनीत व्यापारी पध्दतीचे गॅस सिलिंडर नाहीत. त्यामुळे गॅस शव दाहिनी सुरू करता येत नाही, असे कारण स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने दिले की पार्थिव घेऊन आलेले नागरिक आणि कर्मचारी यांच्यात दररोज वादावादीचे प्रसंग होत आहेत.

कल्याण, डोंबिवलीतील सहा ते सात स्मशानभूमींमध्ये पालिकेने गॅस शव दाहिन्या उभारल्या आहेत. नागरिकांच्या मागणीप्रमाणे पार्थिव लाकडावर किंवा गॅस शव दाहिनीत दहन केले जाते. स्मशानभूमीत येणारे बहुतांशी नागरिक पार्थिव गॅस शव दाहिनीत दहन करण्यासाठी आग्रही असतात. व्यापारी गॅस सिलिंडर नसल्याने मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. गॅस शवदाहिनी बंद असल्याने लाकडाच्या साहाय्याने पार्थिव दहन करावे लागते.

या प्रक्रियेसाठी स्मशानभूमीत चार हजार रूपये रोख भरावे लागतात. काही सामान्य नागरिकांची एवढे पैसे भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते. त्यांची यामुळे कोंडी होते. लाकडामुळे धूर होऊन प्रदूषण होते. स्मशानभूमीतील गॅस सिलिंडर टंचाईसाठी नियंत्रक अधिकाऱ्यांना नगरसेवक, पदाधिकारी यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. शिधावाटप नियंत्रक विभागाकडून पुरेसा व्यापारी गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे. युध्दाच्या झळा कमी झाल्या असल्या तरी कल्याण डोंबिवली पालिकेच्या मागणीप्रमाणे स्मशानभूमींना गॅस शव दाहिन्यांसाठी पुरेसा सिलिंडर साठा मिळत नाही, असे पालिका अधिकारी सांगतात.

युध्दामुळे स्मशानभूमीना पुरेशा प्रमाणात व्यापारी गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नाही. शिधावाटप नियंत्रक विभागाला दर महिन्याच्या कोट्याप्रमाणे स्मशानभूमींना उपलब्ध साठा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. व्यापारी सिलिंडर पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे लाकडावर पार्थिव दहन करावे लागतात. गॅस शव दाहिन्यांमध्ये पाईपद्वारे गॅस (पीएनजी) पुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. – मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता, डोंबिवली.

कल्याणमधील स्मशानभूमींमध्येही गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमी ही फक्त महानगर गॅसच्या माध्यमातून चालवली जाते. कल्याणमध्ये स्मशानभूमींमध्ये पीएनजीद्वारे गॅस पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. – जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता, कल्याण.