कल्याण – संख्याबळाची जुळवाजुळव करून कल्याण डोंबिवली पालिकेचे महापौर पद एकहाती बळकावलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने स्थायी समितीचे सभापती पद आपल्या भक्कम संख्याबळाच्या जोरावर भाजपला मिळू नये म्हणून जोरदार हालचाली दोन दिवसांपासून सुरू केल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेत वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेना शिंदे गटाला पालिकेतील सत्तेत सहभागी होण्यापासून रोखले. त्याचा वचपा आता शिवसेना शिंदे गटाने कल्याण डोंबिवली पालिकेत भाजपला स्थायी समिती सभापतीपदापासून रोखण्याच्या माध्यमातून काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना शिंदे गटाचे ५३ नगरसेवक, मनसेचे पाच नगरसेवक आणि राष्ट्रवादीचा एक नगरसेवक असे एकूण ५९ संख्याबळ आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तीन फुटीर नगरसेवकांना आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून आपल्या गटात सहभागी करून हे संख्याबळ ६२ करायचे. या माध्यमातून स्थायी समितीत आपले संख्याबळाचे वर्चस्व प्रस्थापित करून भाजपला स्थायी समिती सभापती पदापासून रोखण्याची खेळी शिवसेना शिंदे गटाकडून केली जात असल्याची चर्चा आहे.
वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मागील काही महिन्यांपासून जोरदार शाब्दिक युध्द सुरू आहे. या धुसफुशीतून मंत्री नाईक यांनी नवी मुंबई पालिकेतील सत्ता सहभागापासून शिवसेनेला दूर ठेवले. त्याचा वचपा आता कल्याण डोंबिवली पालिकेत काढण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली आहे. उल्हासनगर, अंबरनाथ पालिकेतही यापूर्वी शिवसेना शिंदे गटाने भाजपला रोखण्यासाठी विविध क्लृप्त्या, व्यूहरचना आखल्या.
कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना शिंदे गट ५३ आणि भाजप ५० असे नगरसेवकांचे पाठोपाठ संख्याबळ आहे. संख्याबळ आणि महायुती म्हणून पालिका निवडणूक एकत्र लढल्याने महापौर पद शिवसेना शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपद नैसर्गिक न्याय तत्वाने भाजपला मिळावे यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप कल्याण जिल्ह्याची बैठक शनिवारी कल्याणमध्ये पार पडली. यावेळी भाजप नेते कपील पाटील यांनी भाजपच्या शीर्षस्थ बैठकीत कल्याण डोंबिवली पालिकेतील स्थायी समितीचे सभापती पद, सभागृह नेतेपद मिळावे भाजपला मिळावे अशी मागणी केली आहे. या पदांसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भाजप नगरसेवकांनी एक पत्र पाठविले आहे.
महायुती असली तरी भाजपला पालिकेतील महत्वाच्या पदापासून रोखण्यासाठी पालिका निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाने मनसेला हाताशी धरले. ठाकरे गटातील तीन फुटीरांना आपल्याकडे ओढून त्यांना शिवसेना शिंदे गटात सहभागी करून घेण्यासाठी जोरदार हालचाली चालविल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ५३, मनसे ५, राष्ट्रवादीचा एक नगरसेवक, ठाकरे गटाचे ३ फुटीर नगरसेवक असे एकूण ६२ संख्याबळ करायचे. आणि भाजपला पालिकेतील स्थायी समिती, महिला बालकल्याण आणि इतर विषय समित्यांपासून रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गटाची जोरदार खेळी सुरू आहे. या खेळीवर भाजप नेते सावध प्रतिक्रिया देत असून बारकाईने नजर ठेऊन आहेत. पालिकेवरील आपली अनेक वर्षाच हुकमत कमी पडू नये म्हणून शिवसेना ही खेळी खेळत असल्याची चर्चा आहे.
