कल्याण – मागील अनेक वर्षानंतर प्रथमच कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील भटके श्वान पकडण्याची मोहीम पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या वर्षभरात १०० हून अधिक जणांना पालिका हद्दीत भटक्या, पिसाळलेल्या श्वानांनी पादचारी, शाळकरी मुलांना जखमी घेऊन त्यांना दंश केला आहे. पालिकेच्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी भटके श्वान या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले होते. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने आता भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुमारे ९० हजार भटके श्वान आहेत. या भटक्या श्वानांना पकडून त्यांना पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रात आणून त्यांच्यावर नसबंदीची प्रक्रिया करून ती पुन्हा आहे त्या भागात सोडणे बंधनकारक असते. मागील पाच ते सहा वर्षात असे प्रकार कधीच पालिका हद्दीत झाले नव्हते. पालिकेचे निर्बिजीकरण केंद्र गैरव्यवहाराचा अड्डा बनले होते. भटके श्वान पकडून न आणता ते पकडून आणले आहेत. त्यांच्यावर निर्बिजीकरणाची, लसीकरणाची प्रक्रिया केली आहे असे दाखवून सुमारे १ कोटी ५० लाखाची देयके आरोग्य विभागातील कर्मचारी काढत होते.

पालिका हद्दीत भटके श्वान वाढत आहेत. नागरिकांना या श्वानांचा सर्वाधिक त्रास होत आहे हे माहिती असुनही आरोग्य विभागातील निर्बिजीकरण केंद्राशी संबंधित कर्मचारी या केंद्राच्या माध्यमातून गैरव्यवहार करण्याच्या कामात गुंतून पडले होते. शाळकरी मुलांना, लहान मुलांना भटकी कुत्री झुंडीने येऊन हल्ला करत होती. वृध्द, ज्येष्ठांना या श्वानांनी लक्ष्य केले होते. पालिकेचे वरिष्ठ अधिकारीही याविषयी गुपचिळी धरून बसले होते. अखेर जाणते नागरिक मनोज कुलकर्णी यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाशी संबंधित निर्बिजीकरण केंद्रातील गैरव्यवहार माहिती अधिकारातून बाहेर काढला. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर अखेर एका नियंत्रक कर्मचाऱ्याला मागील वर्षी आयुक्त अभिनव गोयल यांनी निलंबित केले.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. स्मिता रोडे पालिकेत असेपर्यंत निर्बिजीकरण केंद्राचा कारभार शिस्तीने चालेल, शहरातील भटकी कुत्री पकडून आणून त्यांची नसबंदी केली जाईल. भटक्या श्वानांपासून नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी त्या काटेकोर होत्या. डाॅ. रोडे पालिकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर भटके श्वान पकडण्याची मोहीम ढेपाळली. निर्बिजीकरण केंद्रात अनागोंदी कारभार बोकाळला. मागील पाच वर्षात तर हे केंद्र गैरव्यवहाराचे आगर बनले होते. भटक्या श्वानांच्या नावे खोटी कोटीच्या रकमेची देयके काढणे हा एकमेव धंदा या विभागात सुरू होता.

नगरसेवक आक्रमक

पालिकेत आता नगरसेवक राजवट आल्यापासून सर्व पक्षीय नगरसेवकांनी भटके श्वान या विषयावर पालिकेला प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. पालिकेची निर्बिजीकरण केंद्र संख्या वाढविण्याची सूचना केली आहे. तसेच नियमित पालिका हद्दीतील विविध भागातील भटकी कुत्री पकडून आणून त्यांच्यावर नसंबदीची प्रक्रिया करावी. जेणेकरून भटक्या श्वानांचा नागरिकांना उपद्रव होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना नगरसेवकांनी प्रशासनाला केल्या आहेत.

भटक्या श्वानांना पकडण्यासाठी सुसज्ज दोन अद्ययावत गाड्या तयार ठेवाव्यात. अलीकडे या विभागात दोन वाहने आहेत. पण त्यामधील एक कायमस्वरूपी बंद असते. तर एक वाहन निर्बिजीकरण केंद्रात उभे असुनही ते वाहन टिटवाळा, पलावा, कल्याण पूर्वेत गेले आहे अशी खोटी कारणे सांगून तक्रारदार नागरिकांची बोळवण केली जात होती. तो प्रकार आता नगरसेवक राजवट आल्यापासून बंद झाला आहे.

आता जाळीचे सापळे घेऊन निर्बिजीकरण केंद्रातील कामगार शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठी नियमित शहराच्या विवध भागात दिसू लागली आहेत.