कल्याण : साहित्य, गायन, नाट्य रसिकांची मांदियाळी असलेल्या डोंबिवलीतील पालिकेचे सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेले १३ महिने दुरुस्ती, नुतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे. यामुळे पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्याबरोबर रसिक प्रेक्षकांना नाट्य, गायन कार्यक्रमांना मुकावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नूतनीकरण प्रक्रियेत असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवड्यात आयुक्त अभिनव गोयल नाट्यगृहाच्या ठिकाणी आले. त्यांनी कामाची संथगती प्रगती पाहून ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. आयुक्त गोयल यांचा रुद्रावतार पाहुन ठेकेदारासह सोबतीला उपस्थित असलेले काही पालिका अधिकारी या सगळ्या प्रकाराने हादरले. गेल्या वर्षभरापासून बंद असलेले नाट्यगृह कधी सुरू होणार या प्रतीक्षेत नागरिक आहेत.
पालिकेने लवकर हे काम पूर्ण करून नाट्यगृह तातडीने रसिकांसाठी खुले करावे म्हणून डोंबिवलीतील नाट्य रसिकांची मागणी आहे. अनेक जाणत्या रसिकांनी याविषयी पालिकेच्या वरिष्ठांकडे वेळोवेळी मागणी केली आहे. फुले नाट्यगृह बंद ठेऊन, वर काम वेळेत पूर्ण न करता आमचा नाट्य, गायन, साहित्यिक कार्यक्रमांचा आनंद हिरावून घेत असल्याच्या प्रतिक्रिया नाट्यरसिकांनी व्यक्त केल्या आहेत.
डोंबिवलीतील कथक नृत्य, शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन, गायन, नृत्य व साहित्यिक संस्थांचे कार्यक्रम नाट्यगृह बंद असल्याने शहरातील विविध सभागृहांत घेण्यात येत आहेत. फुले नाट्यगृहाची आसनक्षमता सुमारे ८५० आहे. त्यामुळे या नाट्यगृहात तिकीट दराप्रमाणे कार्यक्रम घेणे अनेक संस्थांना परवडते. ते या नाट्यगृहाला पसंती देऊन रसिक आवडीचे कार्यक्रम नियमित या नाट्यगृहात आयोजित करतात. नाट्यगृहापेक्षा खासगी सभागृहांचे भाडे अधिक असल्याने अनेक संस्था आपल्या कार्यक्रमांना मुरड घालत आहेत.
आयुक्तांचा संताप
गेल्या आठवड्यात आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, बांधकाम, प्रकल्प विभागाचे अभियंते सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आले. त्यावेळी तेथील संथगती काम पाहून आयुक्त गोयल संतप्त झाले. मोजकेच कामगार याठिकाणी आरामात काम करत होते. येत्या दोन ते तीन महिन्यांत काम वेळेत पूर्ण होईल, याची खात्री दिसत नसल्याने आयुक्त गोयल यांनी या कामाच्या ठेकेदाराला काम कधी पूर्ण होईल आणि संथगती कामाबद्दल प्रश्न करून फैलावार घेतले.
याआधी सेवानिवृत्त प्रकल्प अभियंता रोहिणी लोकरे नियमित फुले नाट्यगृह कामाच्या ठिकाणी येऊन काम वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रयत्नशील होत्या. त्या दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या.
तारखांवर तारखा
वर्षभरापासून फुले नाट्यगृह विविध तारखांना सुरू होईल, असे पालिकेने जाहीर केले होते. परंतु त्यातील एकाही तारखेची पूर्तता आजवर करण्यात आलेली नाही. १५ ऑगस्टपर्यंत सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता दोन महिन्यांपूर्वी पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. फुले नाट्यगृह सुरू होण्यास अद्याप दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांसाठी तरी फुले नाट्यगृहग सुरू करा, अशी रसिकांची मागणी आहे.
गेल्या वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात फुले नाट्यगृहातील छताचा काही भाग कोसळला होता. ते निमित्त पुढे करुन मग संपूर्ण नाट्यगृह एका वजनदार लोकप्रतिनिधीच्या आग्रहामुळे पालिकेने नूतनीकरणाच्या प्रक्रियेत अडकवल्याची प्रतिक्रिया एका जाणकाराने नोंदवली.
