कल्याण : भटक्या कुत्र्यांसाठी कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे पत्रीपूल भागात चालविण्यात येणाऱ्या निर्बिजीकरण आणि लसीकरण केंद्रातील गैरव्यवहाराची फेरचौकशी केली जाईल. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी सोमवारच्या महासभेत दिले. त्यामुळे याप्रकरणात आरोग्य विभागातील आणखी चार अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षी पालिका निर्बिजीकरण केंद्राचा नियंत्रक कर्मचारी कमलेश सोनावणे यांना या केंद्रातील गैरव्यवहारप्रकरणी प्रशासनाने निलंबित केले. भटक्या कुत्र्यांची शहरातील वाढती, लहान मुले, नागरिकांवर या कुत्र्यांचे होणारे वाढते हल्ले. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेले भितीचे वातावरण. तसेच, या भटके श्वान निर्बिजीकरण आणि लसीकरण, तेथील डाॅक्टर, या केंद्राचा अनागोंदी कारभार, या केंद्रात प्राणी मित्रांना मिळणारी वागणूक या विषयी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक जयेश म्हात्रे यांनी महासभेत विषय उपस्थित केला होता.
याविषयावरील चर्चेत नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेविका खुशबू चौधरी, विश्वनाथ राणे, मंदार हळबे, प्रल्हाद म्हात्रे, नीलेश शिंदे सहभागी झाले होते. कल्याण डोंबिवली भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या कुत्र्यांचे पालिकेकडून वेळीच निर्बिजीकरण, लसीकरण केले जात नाही. त्यामुळे बिबट्यासारखी दहशत या कुत्र्यांची कल्याण, डोंबिवलीत निर्माण झाली आहे. झुंडीने ही कुत्री नागरिक, लहान बालकांवर एकावेळी हल्ला करतात. पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रातील अनागोंदी कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका म्हात्रे यांनी केली.
श्वान गणना नाही
मागील अनेक वर्षात पालिका हद्दीत श्वान गणना झाली नाही. पालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये सुमारे १५० ते २०० भटके श्वान आहेत. या श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचे काम कुचकामी संस्थेला पालिकेकडून देण्यात येते. शासन दराप्रमाणे नसबंदीसाठी एक हजार ६५० रूपयांचा शासकीय दर आहे. पालिकेतील हे काम करणारी संस्था तो दर ९८९ रूपये आकारते. कमी दरात काम त्यामुळे कसेही काम करा अशी ठेकेदार संस्थेची मानसिकता होते. त्यामधून या निर्बिजीकरण केंद्रात हे प्रश्न निर्माण होऊन याठिकाणी गैरप्रकार घडत आहेत, असे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी सांगितले.
जबाबदार कोण?
नगरसेविका खुशबू चौधरी यांनी अभ्यासपूर्णरितीने हा विषय सभागृहात मांडला. निर्बिजीकरण केंद्राच्या निधीतील गैरव्यवहारात एकटे कमलेश सोनावणे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने त्यांना निलंबित केले, असे ‘लोकसत्ता’ दैनिकात वाचले. एकटे सोनावणेच या सर्व प्रक्रियेला जबाबदार होते का. या प्रक्रियेत आणखी काही अधिकारी, कर्मचारी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यापूर्वीच्या या केंद्रातील डाॅक्टरने एकाच कामाचे दोन आस्थापनांमधून मानधन घेतले. ते वसूल केले का. भटक्या श्वानांना खाऊ टाकण्यासाठी पालिकेने जागा निश्चित कराव्यात, अशी मागणी चौधरी यांनी केली. नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह इतर नगरसेवकांनी याप्रकरणाची चौकशी करून हे निर्बिजीकरण केंद्र सुस्थितीत चालेल आणि आणखी वाढीव केंद्र कसे सरू करता यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या.
भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण केंद्र आधुनिक पध्दतीने चालविले यासाठी प्रयत्न केले जातील. श्वान गणना केली जाईल. या निर्बिजीकरण केंद्रातील गैरव्यवहाराचा फेर चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल. – अभिनव गोयल, आयुक्त.
