कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभाग हद्दीतील टिटवाळा वडवली भागात भास्कर हिंदी विद्यालयाच्या संस्था चालकाने पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता शाळेच्या आवारात बेकायदा बांधकाम केले. या बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्यात आता त्यात विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहेत. या बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिकेच्या अ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात या शाळेच्या संस्था चालकाविरूध्द एमआरटीपीचा गुन्हा सोमवारी दाखल केला.

जगदिश प्रसाद आर. पाठक असे भास्कर हिंदी विद्यालयाच्या संस्था चालकाचे नाव आहे. अ प्रभागाचे अधीक्षक शंकर जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अ प्रभाग हद्दीतील टिटवाळा, बल्याणी, बनेली, वडवली, वासुंद्री रस्ता परिसर बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जाते. मागील दोन वर्षापूर्वी अ प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी टिटवाळा परिसरातील पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे जमीनदोस्त केली.

या सततच्या कारवाईने भूमाफियांचे कंबरडे मोडले होते. पाटील यांची या प्रभागातून गेल्या वर्षी बदली झाल्यानंतर या प्रभागात जयवंत चौधरी यांची प्रशासनाने साहाय्यक आयुक्त म्हणून बदली केली. या पदावर काम करण्याचा अनुभव नसल्याने चौधरी यांची अ प्रभागावरील पकड ढिली झाली. त्याचा गैरफायदा घेत भूमाफियांनी पुन्हा बेसुमार बेकायदा बांधकामे टिटवाळा अ प्रभागात उभारली.

या बेकायदा बांधकामांना फक्त कारवाईच्या नोटिसा चौधरी यांच्याकडून पाठविल्या जात होत्या. प्रत्यक्षात बेकायदा चाळींवर फक्त कारवाईचा देखावा केला जात होता, अशा तक्रारदारांच्या तक्रारी होत्या. आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे चौधरी यांच्या बेशिस्त कामकाज आणि बेकायदा बांधकामांना पाठबळ देण्याविषयीच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या.

शाळा चालक गुन्हा

टिटवाळा अ प्रभागात वडवली भागात जगदीश प्रसाद पाठक यांनी आपल्या भास्कर हिंदी विद्यालयाच्या आवारात ३० बाय ३० आकाराचे बेकायदा बांधकाम केले होते. या विषयीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी या बेकायदा बांधकामधारकाला या बांधकामाच्या आवश्यक परवानग्या, कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दिली होती. ही कागदपत्रे पाठक पालिकेत सादर करू शकली नाहीत.

त्यामुळे हे बेकायदा बांधकाम तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी अनधिकृत घोषित केले होते. हे बांधकाम तोडण्याची कार्यवाही सुरू असतानाच तत्कालीन साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची बदली झाली. त्यानंतर आलेल्या साहाय्यक आयुक्त चौधरी यांनी या बेकायदा बांधकामावर कारवाई केली नाही.

आयुक्तांनी बेकायदा बांधकामांवर कारवाईचे सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशावरून अधीक्षक शंकर जाधव यांनी भास्कर हिंदी विद्यालयाच्या शाळा चालका विरूध्द महाराष्ट्र प्रादेशिक नगर व नियोजन कायद्याने (एमआरटीपी) खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चौधरी साहाय्यक आयुक्त असताना तुफान बेकायदा बांधकामे सुरू असताना अशाप्रकारचा एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. बेकायदा बांधकामे, मालमत्ता कर वसुलीत मागे पडल्याने चौधरी आयुक्तांच्या नजरेत आले होते. अखेर आयुक्तांनी त्यांना निलंबनाची नोटीस पाठविताच ते आजारी पडून वैद्यकीय रजेवर निघून गेले आहेत. आता चौधरी हजर होताना एका वरिष्ठ दुय्यम अधिकाऱ्याच्या आशीर्वादने अ प्रभागात की मुख्यालयात दुय्यम पदावर हजर होतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.