कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा मंगळवार, ता. २९ रोजी सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत बंद राहील. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली पालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी केले आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांतील विद्युत उपकरणे, यांत्रिकी उपकरणे, विद्युत वाहिका यांची मंगळवारी देखभाल व दुरुस्ती केली जाईल. मागील तीन महिन्यांच्या काळात मुसळधार पाऊस पडल्याने उल्हास नदीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी उचलताना विद्युत यंत्रणेवर ताण येत होता. पावसाच्या काळात विद्युत देखभाल दुरुस्तीची आव्हानात्मक कामे करणे शक्य नव्हते. त्यामुळे पालिका पाणीपुरवठा विभागाने ही कामे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हाती घेतली आहेत.
बारावे, मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व, पश्चिम भागाला, टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून मांडा, टिटवाळा व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होतो. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाला पाणीपुरवठा केला जातो. मंगळवारी सकाळी या सर्व भागांचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहील. असे कार्यकारी अभियंता डावरे यांनी सांगितले.
