कल्याण: मागील सात महिन्यापासून कल्याण डोंबिवली शहरातील टोईंग व्हॅन बंद आहेत. टोइंग व्हॅन बंद असल्याने दुचाकी, मोटार कार चालक रस्ते, गल्ली बोळात वाहने, पादचाऱ्यांना अडसर होईल अशा पद्धतीने वाहने उभे करून ठेवत आहेत. या वाहनांमुळे रस्त्यांवर वाहनांचा बाजार भरला आहे, असे दृश्य कल्याण, डोंबिवली दिसत आहे.
मागील अनेक वर्ष कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक विभागाकडून रेल्वे स्थानक आणि अंतर्गत परिसरात रस्त्यांवरील बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन फिरवली जात होती. शहरात टोईंग व्हॅन फिरवली जात असल्याने वाहन चालक आपली वाहने वाहतूक विभागाकडून कारवाई होणार नाही अशा पद्धतीने वाहनतळावर, वाहतूक विभागाने आखून दिलेल्या रस्त्यांवर उभी करत होते.
मागील दीड वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील शहरी पट्ट्यात टोईंग व्हॅन सुरू करायची की नाही याविषयी पोलीस आणि वाहतूक विभागात रस्सीखेच सुरू होती. मधल्या काळात काही महिने टोईंग व्हॅन सुरू करण्यात आल्या. परंतु त्या पुन्हा बंद करण्यात आल्या. टोईंग व्हॅन सुरू असली की वाहन चालकांनी रस्त्यावर बेशिस्तिने उभे केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस ई चलन पद्धतीने किंवा ते वाहन टोइंग व्हॅनच्या मदतीने उचलून घेऊन जातो होते. वाहन चालकाला ही मोठी शिक्षा होती.
दुकानातून बाजारातून वाहन चालक परत आपल्या वाहनाजवळ आला की त्याला त्या ठिकाणी आपली वाहन दिसत नसे. आपले वाहन वाहतूक विभागाने उचलून नेल्याचे नेल्याचे समजल्यावर वाहन चालकाची काळजी वाढत होती.
टोईंग व्हॅन मागील काही महिन्यांपासून बंद असल्याने कल्याण डोंबिवली शहरातील वाहन चालकांना आता कोणताही धाक राहिलेला नाही. वाहन चालक रस्ते, गल्लीबोळात आपल्या वाहनामुळे पादचरी वाहतुकीला अडथळा होईल असा कोणताही विचार न करता वाहने उभी करून ठेवत आहेत.
कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर दुचाकी वाहने उभी करून ठेवण्यात येत आहेत. या वाहनांचा दुकानदार, व्यापाऱ्यांना सर्वाधिक त्रास होत आहे. दुकानांचे मार्ग बंद करून ही वाहने उभी करून ठेवण्यात येत असल्याने अनेक दुकानदारांनी याविषयी वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
वाहनतळ बंद
डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील स्वामीनारायण मंदिराजवळील रेल्वेचे वाहनतळ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या वाहन तळावरील सर्व दुचाकी वाहने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर उभी करण्यात येत आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पालिकेचे पाटकर प्लाजामध्ये वाहन तळ आहे. राजकीय वर्चस्व वादामुळे हे वाहन तळ पालिकेला सुरू करता येत नाही. या वाहनतळावर सुमारे अडीचशे ते तीनशे दुचाकी वाहने उभी राहू शकतात. पालिका वाहतूक आरटीओ अधिकाऱ्यांनी मागील काही वर्षांपूर्वी हे वाहन तळ सुरू करण्याचा प्रयत्न केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालिका, आरटीओ, वाहतूक अधिकाऱ्यांच्या मागे लागून या वाहन तळावर रिक्षा, दुचाकी उभी राहतील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती नसल्याने आणि काही इतर पक्षातील राजकीय मंडळी या प्रकरणात अनावश्यक हस्तक्षेप करीत असल्याने प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे प्रयत्न या ठिकाणी तोकडे पडले.
कंत्राटाकडे पाठ
ठाणे वाहतूक विभागाने टोईंग व्हॅनचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. परंतु कोणीही ठेकेदाराने ही निविदा स्वीकारली नाही. ज्या वाहन चालकांची वाहने उचलली जातात ते ते विविध प्रकारचे आरोप टोइंग व्हॅन मालक आणि कर्मचाऱ्यांवर करतात. काहीजण पोलीस ठाण्यात तक्रारी करतात, न्यायालयात दाद मागतात. काहीजण वाहनाचे नुकसान झाल्याचे आरोप करतात. त्यामुळे ठेकेदार ही निविदा स्वीकारण्यात येत नसल्याचे वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
