डोंबिवली – कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक विभागाच्या एकूण चार टोईंग व्हॅन मागील तीन महिन्यांपासून बंद आहेत. टोईंग व्हॅन बंद असल्याने आपल्या वाहनावर कारवाई होणार नाही याची जाणीव असल्याने अनेक नागरिक मिळेल त्या रस्ते, गल्ली, चौकात आपले दुचाकी, चारचाकी वाहन उभी करत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरात एका नव्या वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. टोईंग व्हॅन बंदमुळे वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिसांचीही डोकेदुखी या प्रकाराने वाढली आहे.

मागील वर्षभर बंद असलेल्या वाहतूक विभागाच्या टोईंग व्हॅन पुन्हा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. टोईंग व्हॅन शहरात फिरत असल्या की वाहन मालक वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई होईल. आपले वाहन उचलून नेले जाईल. वाहनाच्या चाकाला जॅमर लावले जाईल या भीतीने वाहन वाहनतळावर किंवा आडमार्गाला उभे करत होता. डोंबिवली, कल्याणमधील टोईंग व्हॅन मागील तीन महिन्यापासून बंद आहेत. याची जाणीव असल्याने अनेक दुचाकी स्वार, मोटार वाहन मालक शहरातील मुख्य बाजारपेठा, चौकांमध्ये आपली वाहने उभी करून ठेवत आहेत.

अनेक नोकरदार वर्ग डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागातील मिळेल त्या जागेत आपली वाहने उभी करून रेल्वेने आपल्या कामाच्या ठिकाणी निघून जात आहेत. वाहतूक पोलिसांना वाहतूक नियोजन करताना अशी वाहने नजरेत आली तर त्यांच्यावर ऑनलाईन माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. टोईंग व्हॅन नसल्याने वाहतूक पोलिसांना ही वाहने उचलून नेता येत नाहीत.

अशी वाहने कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठेचा भाग, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर दिसून येत आहेत. डोंबिवलीत मानपाडा रस्ता, रामनगर, नेहरू रस्ता, आगरकर रस्ता, फडके रस्ता, नेहरू रस्ता, पाटकर रस्ता, पश्चिमेत महात्मा गांधी रस्ता, गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक भागात ही वाहने रस्ते अडवून उभी करून ठेवण्यात आली आहेत. कल्याणमध्ये मुरबाड रस्ता, वलीपीर रस्ता, बस आगार रस्ता, रेल्वे स्थानक भागातील चौक, रस्ते दुचाकी, चारचाकी वाहनांनी गजबजून गेले आहेत.

या वाहनांमुळे अलीकडे शहरात सर्वाधिक कोंडी होत आहे. कल्याण, डोंबिवली शहरात सीमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. या कामांसाठी सामान घेऊन येणारे मालवाहू ट्रक, मिक्सर, ट्रॅक्टर, रोलर यांची शहरात सतत वर्दळ असते. ही अवजड मोठ्या आकाराची वाहने रस्तोरस्ती उभे करून ठेवण्यात आलेल्या दुचाकी वाहनांमुळे अडून राहतात. त्यामुळे शहरात अनेक भागात वाहतूक कोंडी होत आहे. ही कृत्रिम वाहन कोंडी विचारात घेऊन वाहतूक विभागाने कल्याण, डोंबिवली शहरातील टोईंग व्हॅन लवकर सुरू कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एका टोईंग वाहनावर पाच कामगार काम करत असतात. या कामगारांवर काम नसल्याने बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. टोईंग वाहन मालक वाहन बंद असल्याने चिंतेत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील टोईंग वाहनांचे कंत्राट संपले आहे. नवीन निविदा प्रक्रिया सुरू करून ही वाहने लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. -पंकज शिरसाट उपायुक्त, वाहतूक विभाग.