Eknath Shinde On Kalyan-Dombivli Traffic: कल्याण डोंबिवली शहर परिसरात अनेक रस्ते प्रकल्प, मेट्रो मार्ग, उन्नत दुमजली मार्ग, बाह्यवळण रस्ते आणि इतर राज्यांमधून येणाऱ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. या सर्व दळणवळणांच्या प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात कल्याण, डोंबिवली शहरे लवकरच वाहतूक कोंडी मुक्त होतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केले.

कल्याणमधील फडके मैदानात एमसीएचआय कल्याण शाखेतर्फे प्राॅपर्टी प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाला रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध गृहप्रकल्प, तेथील मुलभूत सोयीसुविधांच्या प्रतिकृतींची पाहणी केली. विकासक हाही विकास प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे विकासकांनी शासना बरोबर समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. समन्वयाने काम केले तर अनेक महत्वाचे समस्या तातडीने सुटून विकास प्रकल्प, गृहप्रकल्प मार्गी लागण्यात अडथळे येणार नाहीत. विकासकांच्या सर्व समस्या, प्रश्न सोडविण्यास शासन कटिबध्द आहे. विकासकांनी घरांच्या किंमती सामान्यांना परवडतील अशा पध्दतीने ठेवल्या पाहिजेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सूचित केले.

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो ५ प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. शिळफाटा रस्ता तीन पदरी करण्याचे नियोजन आहे. कल्याण, डोंबिवली शहरातील वाहन कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी टिटवाळ ते काटई हा शहराबाहेरून जाणारा बाह्य वळण रस्ता लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे. या कामात काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी आहेत. त्या पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

कल्याण जवळील ठाणे-पडघा आठ पदरी मार्गिका, याच मार्गावरील उन्नत मार्ग या प्रकल्पांमुळे कल्याण, भिवंडी, ठाणे परिसरासह मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक सुरळीत होण्यास साहाय्य होणार आहे. या सर्व रस्ते प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात हा भाग वाहन कोंडी मुक्त असेल. जेएनपीटी-बडोदा महामार्गाला कल्याण शहर परिसरात पोहच रस्ता उपलब्ध करून देण्याची विकासकांची मागणी विचारात घेऊन याविषयी आपण संबंधित विभागाला सूचना करू. ती सूचना अंमलात येईल यादृष्टीने पाठपुरावा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

एमएमआर क्षेत्रातील वाढते नागरिकरण आणि वाढती पाण्याची गरज ओळखून नवीन जलस्त्रोत तयार करणे, धरणांसाठी शासन कटिबध्द आहे. काळू धरणाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या नवीन जलस्त्रोतांमुळे या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. कल्याण रेल्वे स्थानक भागातील सॅटिस प्रकल्प लवकर पूर्ण करून रेल्वे स्थानक परिसर कोंडी मुक्त करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना केल्या.

मुंबई महानगर प्रदेश वाहन कोंडी मुक्त करण्यासाठी आणि यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एक स्वतंत्र सल्लागार नेण्याचा विचार सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी आयुक्त अभिनव गोयल, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, उपायुक्त अतुल झेंडे, एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील, एमसीएचआय कल्याण शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.