कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरात रिक्षा चालका शेजारी चौथ्या आसनावर प्रवासी घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांंवर कारवाईसाठी शनिवारपासून वाहतूक पोलिसांंबरोबर स्थानिक पोलीसह रस्त्यावर उतरले आहेत. रिक्षेत चौथा प्रवासी दिसला की रिक्षा चालकासह चौथ्या प्रवाशाला घेऊन पोलीस थेट पोलीस ठाण्यात पोहचून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याने कारवाई करत आहेत.
रिक्षा चालकांना तीन आसनी प्रवासाचे परिवहन विभागाकडून परमिट दिले जाते. चौथा प्रवाशी घेऊन प्रवासाची रिक्षा चालकांंना परवानगी नाही. रिक्षेला काही अपघात झाला तर रिक्षा चालकाच्या शेजारी बसलेल्या चौथ्या आसनावरील प्रवाशाला अपघाती विमा मिळणार नाही. त्यामुळे ही नियमबाह्य वाहतूक रोखण्यासाठा ठाणे जिल्ह्यात रिक्षा चालकांविरुध्द कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे एका वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
अपघात झाल्यानंतर रिक्षा चालक सुटून जाईल, पण चौथ्या आसनावर बसणाऱ्या प्रवाशाला कायद्याने कोणतीही भरपाई मिळणार नाही. प्रवाशांनी हे ओळखून चौथ्या आसनावर रिक्षेत बसू नये, असे आवाहन वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.
पोलीस आक्रमक
चौथ्या आसनावर प्रवासी घेणाऱ्या रिक्षा चालकांवर शनिवारी डोंबिवली पूर्वेत कारवाई सुरू होती. त्यावेळी काही मोजक्या रिक्षा चालकांनी वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील इंदिरा चौकात हेतुपुरस्सर रिक्षा मुख्य वर्दळीच्या रस्त्यात आडव्या उभ्या करून रस्ता रोको आंदोलन करून प्रवासी वाहतुकीला अडथळा आणला. यावेळी पूर्व भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांना तासभर रिक्षा न मिळाल्याने प्रवाशांचे हाल झाले. रिक्षा चालकांच्या या मनमानीबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यात सर्वत्र वाहतूक पोलिसांची चौथा प्रवासी घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई सुरू आहे. मग,डोंबिवलीतील रिक्षा चालकांनी आंदोलन करून प्रवाशांना वेठीस का धरले, असे प्रश्न प्रवाशांनी केले.
वरात पोलीस ठाण्यात
डोंबिवली, कल्याणमध्ये रस्तोरस्ती पोलीस, वाहतूक पोलीस चौथ्या आसनावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना अडवून त्यांच्यावर दहा हजार रूपये दंडाची कारवाई करत आहेत. चौथ्या आसनावर बसलेल्या प्रवाशासह रिक्षा चालकाला घेऊन पोलीस थेट पोलीस ठाण्यात पोहचतात. रिक्षा चालक आणि चौथ्या आसनावरील प्रवाशावर मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितेप्रमाणे कारवाई करत आहेत. या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या रिक्षा चालकांनी समुहाने येऊन काही राजकीय मंडळींना हाताशी धरून विरोध करण्याची तयारी केली आहे. परंतु ही कारवाई कायद्याप्रमाणे सुरू असल्याने कोणीही लोकप्रतिनिधी, नेता या कारवाई विरुध्द आक्रमक भूमिका घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे समजते. या कारवाईबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. बसमध्ये कोंबून प्रवासी भरले जातात. त्या प्रवाशांवर कोणी कारवाई करत नाही. मग रिक्षा चालकाने एक प्रवासी वाढीव भरला तर बिघडले कोठे, असे प्रश्न रिक्षा चालक करत आहेत.