कल्याण – कल्याण, डोंबिवलीत दोन वेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का बसून दोन कामगारांचा मृत्यू झाला. एका कामगाराचा मृत्यू कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीतील एका बिर्याणी दुकानात, तर, दुसरी घटना कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथे घडली आहे.

अजयकुमार दसई गौतम (२०) असे एका मृत कामगाराचे नाव आहे. तो मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील बस्ती जिल्ह्यातील मल्लीपूर तालुक्यातील बाबुपुरा गावचा रहिवासी आहे. अजयकुमारचा नवी मुंबईत कोपरखैरणे येथे राहणारा नातेवाईक अतुलकुमार गौतम याने या मृत्यूप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्याने तक्रार नोंदवून घेतली आहे.

पोलीस ठाण्यातील माहिती, अशी की सुषमा गौतम यांचा मोठा मुलगा अजयकुमार गौतम हा मुंबईत काही कामानिमित्त आला होता. मुंबईत मिळेल ते काम करून याठिकाणीच बस्तान बसविण्याचे त्याचे नियोजन होते. कामाच्या शोधात असताना अजयकुमारला डोंबिवलीजवळील शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीतील ताज बिर्याणी दुकानात काम मिळाले. तेथे तो मागील एक महिन्यापासून काम करत होता.

रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान बिर्याणी दुकानातील आवराआवर झाल्यानंतर अजयकुमारने भोजन केले. आणि तो हात धुऊन दुकानात उभ्या असलेल्या एका लोखंडी मंचकावर काही ठेवण्यास गेला. हात ओले असल्याने आणि त्या लोखंडी मंचकात वीज प्रवाह आल्याने अजयकुमारचे हात लोखंडी मंचकाला लागताच, अजयकुमार वेगाने दुकानात फेकला गेला. काही क्षणात तो बेशुध्द पडला. त्याला तातडीने इतर कामगारांनी, दुकान मालकाने डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात आणले. तेथे त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक साबळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, चव्हाण, साहाय्यक पोलीस निरीक्षक पाऊलबुध्दे, संपत फडोळ यांनी घटनास्थळी भेट दिली. कुटुंबियांनी आपल्या मृत नातेवाईकाबाबत कोणताही संशय नसल्याचे पोलीस ठाण्यात लिहून दिले आहे.

दुसऱ्या एका घटनेत, कल्याण पश्चिमेत आधारवाडी भागात संदीप घोरीलाल रावत (३५) यांना पाणी खेचण्याच्या मोटारीत आलेला विजेचा प्रवाह आणि त्याचा धक्का बसून रविवारी रात्री मृत्यू झाला. संदीप हा उत्तरप्रदेशातील होरीलाल गावचा रहिवासी आहे. संदीपचा नातेवाईक रिक्षा चालक संजय रावत यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद केली आहे. संदीप हा आधारवाडी तुरुंगा समोरील भानुदास गायकर चाळीत राहत होता. घरा शेजारी पाण्याची मशिन सुरू होती. तेथे हातपाय धुवत असताना अचानक संदीपाला मोटारीत असलेला विजेचा धक्का बसला. तो बेशुध्द पडला. त्याला कुटुंबीय, शेजाऱ्यांनी तात्काळ पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.